Mahavikas Aghadi Morcha : आज मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Mahavikas Aghadi Morcha: भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. या महामोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली असली तरी राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भाजपही मविआच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा पार पडणार आहे. 

भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. 

या महामोर्चात शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, अरविंद सावंत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील काही नेते उपस्थित असणार आहेत. तसेच, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असतील. याशिवाय, मविआच्या मोर्चाला डाव्या पक्षांचा देखील पाठिंबा असणार आहे.

रिचर्डसन क्रुडास मिल, जे. जे. मार्ग उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, टाइम्स ऑफ इंडिया या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. मध्य मुंबईतून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भायखळा येथून नागपाडा जंक्शनमार्गे मुंबई सेंट्रल येथून पुढे जाता येईल किंवा चिंचपोकळी, सातरस्ता मार्गे आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल या रस्त्याने दक्षिण मुंबईकडे जाता येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. चार रस्ता, रफी अहमद किडवाई मार्ग, पी डिमेलो मार्गेही दक्षिण मुंबईत जाण्यासाठी मार्ग मोकळा असेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply