Price Hike News : लसूण ५००, वाटाणा २५० पार, कांदा ८०, निवडणुकीत दरवाढ, सर्वसामान्यांचे बजेट बिघडले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. राज्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. सर्वपक्षीय नेते जिवाचे रान करत प्रचाराचा धुरळा उडवत आहेत. राज्यात ही रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे महागाईचा भडका उडत असल्याचे दिसत आहे. किरकोळ बाजारात कांदा, वाटाणा, लसूण, शेवगा, वालाच्या शेंगा याच्या किंमतीत मोठी वाढ होत असल्याचे दिसतेय. ऐन विधानसभा निवडणुकीत भाववाढ होत असल्यामुळे नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांचे टेन्शन वाढलेय.

परतीच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे आवक कमी झाली, त्याचा परिणाम दरवाढीवर झाल्याचं समजतेय. आठवडाभरापूर्वी कांदा १५ ते ४५ रुपये किलो दराने विकला जात होता. आता हेच दर ५० ते ६५ रुपयांपर्यंत पोहचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ७५ ते ८० रुपये किलो दरांवर पोहचलाय. वाशीमध्ये हेच दर १०० रुपये किलोवर पोहचले आहेत. मिळाल्या माहितीनुसार, पुढील दोन आठवडे कांद्याचे हेच दर राहतील, असा अंदाज आहे.  

लसणाची फोडणी महागली -

मागील वर्ष भरापासून लसणाच्या दरात तेजी दिसत आहे. गुरुवारी बाजार समितीमध्ये लसूण २३० ते ३२० रुपये किलो दराने विकला गेला होता. किरकोळ मार्केटमध्ये हाच दर ५०० रुपयांपर्यंत पोहचलाय. नवे पीक बाजारात येईपर्यंत लसणाची भाव वाढ अशीच सुरु राहू शकते. लसणाच्या किंमती कमी होण्यासाठी सर्व सामान्यांना नव्या वर्षांपर्यंत वाट पाहावी लागू शकते, असे सांगण्यात येत आहे.

वाटाणा २५० पार -

कांदा, लसूणाला महागाईची फोडणी लगली आहेच. त्यात वाटाण्याच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. हिरव्या वाटाणा किरकोळ मार्केटमध्ये २५० रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. मेथीची पेंडीची किंमतही किरकोळ बाजारात ३० रुपयांपर्यंत गेली आहे.

शेवगा शेंगाचे दर किरकोळ मार्केटमध्ये १३० रुपये इतके आहेत. तर वालाच्या शेंगा १२० रुपयांवर पोहचल्या आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply