Maharashtra Untimely Rain : अवकाळीने महाराष्ट्र हादरला! भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू, वीज पडून शेतकरी ठार, कित्येक जनावरांचा बळी

Maharashtra Untimely Rain News: हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यात खामगावसह तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक हिरावलं गेलं. या पावसामुळे शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा मोठ नुकसान झालं आहे. याशिवाय अनेक ठिकाणी जीवितहानी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

भिंत कोसळून दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातलं. यात संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथील गणेश बोरकर यांच्या घराची भिंत कोसळून त्याखाली दोन मुली दबल्याची घटना घडली. कृष्णाली आणि राधा असे या मुलींची नावे आहेत. घटनेनंतर गावकऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि दोघींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी दोन वर्षीय कृष्णाली हिला तपासून मृत घोषित केलं तर राधावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे

वीज अंगावर पडून 40 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. खामगाव तालुक्यात अंबिकापुर शेत शिवारात वीज पडून गोपाल महादेव कवळे या चाळीस वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

वीज कोसळल्याने 8 शेळ्या ठार

बुलढाण्यातील पळशी गावात वीज पडल्याने एका शेतकऱ्याच्या तब्बल 8 बकऱ्या ठार झाल्या आहेत. सातत्याने अवकाळी ढग शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जात आहे.

रत्नागिरीत अवकाळी पावसाने दाणादाण

कोकणात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरीत अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंब्यांचे देखील नुकसान झाले. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जाते आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply