Maharashtra Rain Alert : ‘मोचा’ चक्रीवादळामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Rain Alert: गेल्या महिन्याभरापासून राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवकाळीमुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे. अवकाळीचं हे संकट कधी दूर होईल याची वाट शेतकरी पाहत असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवला आहे. 

मोचा चक्रीवादळ आज पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. तीन राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना अलर्ट दिला आहे.

महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यांना अलर्टही जाहीर करण्यात आला आहे.

विदर्भ आणि छत्तीसगड भागात आज मुसळधार पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडत आहे, तर राज्यातील काही ठिकाणी गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. 

मुंबईतही वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे उकाडा कमी जाणवत आहे. मुंबईत कमाल तापमान ३५ ते ३६ अंशापर्यंत जाऊ शकते. मात्र कमाल तापमानाचा पारा फारसा नसेल, असे हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली वादळी आणि तसेच मे नंतर वाऱ्यांची दिशा बदलण्यास सुरूवात होईल, यामुळे तापमान वाढणार नसल्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply