Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यात महाशिवरात्रीचा उत्साह, शिवमंदिरात गर्दी

  • 15 Feb 2026 09:36 AM (IST)

    दहावी-बारावी परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त होणार, शिक्षण मंडळाचे कडक पाऊल

    राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अत्यंत कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परीक्षेत कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना मदत करणाऱ्या व्यक्तीवर आता थेट अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा सुरू झाली असून, येत्या २० फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून सहा विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली असून, त्यात शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय पोलीस आणि महसूल विभागाची स्वतंत्र पथकेही संवेदनशील केंद्रांवर लक्ष ठेवणार आहेत. विशेष म्हणजे, ज्या केंद्रांवर कॉपीचे प्रकार आढळतील, त्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याची तरतूदही यंदा करण्यात आली आहे.

  • 15 Feb 2026 09:28 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर नगरीत भक्तीचा महापूर, ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल

    नाशिक येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या विशेष दिनानिमित्त संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रभू त्र्यंबकेश्वराचे रूप अधिकच मनमोहक दिसत आहे. पहाटेपासूनच देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने आणि स्थानिक पोलिसांनी सुरक्षेचे तसेच दर्शनाचे चोख नियोजन केले आहे. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात संपूर्ण त्र्यंबक नगरी भक्तिमय झाली असून, भाविकांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 15 Feb 2026 09:20 AM (IST)

    परळीचे वैद्यनाथ मंदिर रोषणाईने उजळले, आकर्षक सजावटीने वेधले लक्ष

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या परळी येथील श्री वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा आणि विशेष सजावटीमुळे हे पवित्र क्षेत्र अधिकच तेजस्वी दिसत आहे. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला आहे. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. मंदिर प्रशासनाने भक्तांच्या सुलभ दर्शनासाठी आणि सुरक्षेसाठी जय्यत तयारी केली आहे. सात दिवसांच्या या यात्रेनिमित्त विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

  • 15 Feb 2026 09:14 AM (IST)

    कल्याणमध्ये MIDC ची जलवाहिनी फुटली, लाखो लीटर पाणी वाया

    कल्याण ग्रामीण परिसरातील हेदुटणे गावाजवळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (MIDC) १६०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने परिसरात हाहाकार उडाला आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे तब्बल ३० ते ४० फूट उंचीचे पाण्याचे फवारे हवेत उडत असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या घटनेमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत असून परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. ही जलवाहिनी मुख्य असल्याने ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी या धक्कादायक दृश्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले असून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

  • 15 Feb 2026 09:08 AM (IST)

    भीमाशंकर नगरी रोषणाईने उजळली, पण भाविकांविना पार पडला सोहळा

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर आणि महादेव नगरी विद्युत रोषणाईने लखलखली आहे. मात्र, सध्या मंदिरात सुरू असलेल्या विकास आराखड्यांतर्गत दुरुस्ती आणि सुशोभीकरणाच्या कामांमुळे यंदाचे दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यंदाची शासकीय महापूजा परंपरेनुसार पार पडली. श्रावण महिन्यापर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण करून भाविकांसाठी भव्य मंदिर खुले करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असून, भाविकांनी या बदलांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे.

  • 15 Feb 2026 09:03 AM (IST)

    अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर दर्शनासाठी खुले, भाविकांची मोठी गर्दी

    महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर अंबरनाथ येथील ऐतिहासिक आणि प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. यंदा सुरक्षेच्या आणि गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने प्रशासनाने भाविकांना गाभाऱ्यात न सोडता बाहेरूनच दर्शनाची व्यवस्था केली आहे. आपल्या लाडक्या देवाचे दर्शन घेण्यासाठी रात्री १२ वाजल्यापासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सुविधेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.



  • विडियो गॅलेरी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *