Maharashtra Monsoon 2023 : अखेर मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; हवामान खात्याची माहिती, पुढील २४ तास धोक्याचे

Maharashtra Monsoon Updates 2023: मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. उशीराने आलेल्या मान्सूनने एका दिवसांतच संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला आहे.

हवामान खात्याकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मान्सूनच्या आगमनामुळे खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून महाराष्ट्रात उशीराने दाखल झाला होता.

११ जून रोजी मान्सूनचं  कोकणात आगमन झालं होतं. मात्र, बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळं मान्सूनचं आगमन राज्यभरात रखडलं. त्यामुळे मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात कधी दाखल होणार याची वाट बळीराजा पाहत होता.

मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला

अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामान विभागाकडून दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे. दरम्यान, मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच,राज्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली.

मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, यासह विविध जिल्ह्यात पावसानं पावसाने धुव्वाधार बॅटिंग केली. मुंबईत आज सकाळपासूनचं पावसाचा जोर सुरू होता. दरम्यान, मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पुढचे ५ दिवस सक्रिय राहणार आहे.

राज्यासाठी पुढील २४ तास धोक्याचे

पुढील पाच दिवसांत कुठे कुठे पाऊस असणार आहे, त्याची माहिती हवामान विभागाने दिली. त्यानुसार कोकण अन् विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र अन् मराठवाडामध्ये ही पावसाचा जोर कायम असणार आहे. मुंबई पुणे, रायगड सातारा, नाशिकमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

रायगडसह कोकणाला धोक्याचा इशारा

मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगडसह कोकणाला हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. कोकणातील काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply