Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा तूर्तास बंद; ६६० बस फेऱ्यांवर परिणाम

मुंबई : बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली. या आंदोलनाचा एसटीच्या सेवांवरही परिणाम झाला. महाराष्ट्रातील विविध भागांतून कर्नाटकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या १४५ एसटी फेऱ्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी यांसह अन्य काही जिल्ह्यांतून कर्नाटकसाठी दररोज ३३० एसटी फेऱ्या होतात. तेवढय़ाच फेऱ्या पुन्हा कर्नाटककडे रवाना होतात. कन्नड संघटनांकडून करण्यात आलेल्या आंदोलनामुळे एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला. एकूण १४५ एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या परिवहन सेवाही थांबवण्यात आल्या आहेत.

गोव्याहून मुंबईसाठी येणाऱ्या खासगी प्रवासी बसवर मंगळवारी बेळगावजवळ दगडफेक करण्यात आल्याची माहिती मुंबई बस मालक संघटनेचे अध्यक्ष हर्ष कोटक यांनी दिली. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन गोव्याला जाणाऱ्या किंवा तेथून येणाऱ्या बस या कोल्हापूरमधील राधानगरी आणि गगनबावडा मार्गे वळवण्यात आल्या आहेत.

कर्नाटकातील गाडय़ांना काळे फासले

पुणे : स्वारगेट भागातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी गाडय़ांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. गाडय़ांवर ‘जय महाराष्ट्र ’ अशी घोषणा लिहून कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध केला. कर्नाटकात महाराष्ट्रातील गाडय़ांवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद पुण्यात उमटले. स्वारगेट भागातील सना ट्रॅव्हल्सच्या परिसरात कर्नाटकातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडय़ा थांबल्या होत्या. कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील गाडय़ांना काळे फासून ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा गाडीवर लिहिली.  या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply