Maharashtra Politics : निकालानंतर राजकारण ढवळून निघालं, बैठकांवर बैठका; CM पदासाठी रेस, मंत्रि‍पदासाठी लॉबिंग

Maharashtra : राज्यात विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आणि महायुतीनं न भूतो... असं तगडं यश मिळवलं. आता निकालानंतर राजकारण ढवळून निघालं आहे. महायुतीमधील मित्रपक्षांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्रि‍पदासाठीची शर्यत अत्यंत चुरशीची झाली आहे. त्यात मागच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले, तसेच विद्यमान मंत्र्यांकडूनही मंत्रि‍पदासाठी लॉबिंग सुरू झाल्याचे चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे.

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी नव्हे ती अत्यंत प्रतिष्ठेची झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर सहा प्रमुख पक्ष आखाड्यात उतरले होते. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची महायुती विरुद्ध काँग्रेस-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी महाविकास आघाडी असा 'सामना' रंगला.

यात महायुतीनं बाजी मारली. भाजप १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली. तर अजित पवारांनीही चांगलं यश मिळवलं. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत सुपडासाफ झाला. काँग्रेस १६, ठाकरे गट २० आणि शरद पवार गट १० अशा एकूण फक्त ४६ जागाच जिंकता आल्या.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? भाजपा नेत्याचा दुजोरा, एकनाथ शिंदेंचं काय? म्हणाले, “भाजपाचा स्ट्राईक रेट..”

गाठीभेटी आणि लॉबिंग सुरू

येत्या काही दिवसांत महायुतीचं सरकार स्थापन होईल. या सरकारमध्ये कोण मंत्री असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पण हे नवं सरकार स्थापन होण्याआधीच मंत्रिपद मिळवण्यासाठी विद्यमान मंत्री आणि इच्छुक नेत्यांमध्ये अहमहमिका लागली आहे. मंत्रिपद मिळावं म्हणून वरिष्ठ पातळीवर लॉबिंग सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय शिरसाट, भरत गोगावले आणि अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचले. तर इतर इच्छुक नवनिर्वाचित आमदारही शिंदेंची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 


शिवसेनेचे नेते सागर बंगल्यावर

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नेते सागर बंगल्यावर पोहोचले. मंत्री दादा भुसे, शंभुराज देसाई आणि ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे या सागर बंगल्यावर पोहोचल्या. मुख्यमंत्रि‍पदाची शर्यत काट्याची झाल्याने आता या पदावरून दोन्ही पक्षांत दावे-प्रतिदावे सुरू झाल्याचे वृत्त आहे.

 


शिवसेना आमदारांचा हॉटेलमधील मुक्काम वाढणार

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत जबरदस्त मुसंडी मारली. निकालानंतर शिवसेना आमदार मुंबईतील आलीशान हॉटेलमध्ये थांबले आहेत. आता हा मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे. आणखी दोन दिवस या आमदारांना थांबण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या २८ किंवा २९ नोव्हेंबरला शपथविधी होण्याची शक्यता असून, त्याबाबतचा निर्णय आज अंतिम होऊ शकतो.

भाजप नेते म्हणतात, मुख्यमंत्री फडणवीसच!

या राज्यात मुख्यमंत्री म्हणून भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली. महाराष्ट्राचे सरकार चालवण्याचे कौशल्य फडणवीसांमध्ये आहे. राज्यातील जनतेचीही इच्छा आहे. महाराष्ट्र हितासाठी फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजेत. तिन्ही पक्ष चर्चा करूनच मुख्यमंत्री ठरवला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply