Korigad Fort : पुणे परिसर दर्शन : एक सदाबहार किल्ला कोरीगड

Korigad Fort : पुण्याहून जर एखाद्या दुचाकीवर मस्त फेरफटका मारायचा असेल तर कोरीगड उत्तम. याला शहागड असेसुद्धा म्हटले जाते. गडावर जायला दोन वाटा आहेत, त्यातील पेठ शहापूरची वाट एकदम सोपी आणि छान आहे, तर आंबवडे या दुसऱ्या पायथ्याच्या गावातून जरा किचकट वाट आहे. गड ॲम्बी व्हॅलीने तीनही बाजूंनी वेढलेला आहे. शहापूर गावातून सोपी चढण चढल्यावर पायऱ्या सुरू होतात. अर्ध्यावर एक गुहा, छोटेखानी गणेशमंदिर आणि पाण्याचे टाके आहे. दरवाजा आणि तटबंदीचे बांधकाम उत्तम आहे.

गडावर कोराईदेवीचे मंदिर, एक शंकराचे मंदिर, दोन मोठी तळी, एक छोटी गणेश गुहा आणि वाड्याचे अवशेष आहेत. तटाला पूर्ण फेरी मारता येते आणि खालचा परिसर सुंदर दिसतो. या किल्ल्याचा पहिला उल्लेख पंधराव्या शतकाच्या अखेरीस सापडतो. तेव्हा हा किल्ला निजामशहाकडून आदिलशाहीत गेला होता. शिवाजी महाराजांनी पवन मावळातील ढमाले देशमुख यांच्या मदतीने हा किल्ला स्वराज्यात आणला, तो पुढे बरीच वर्षं स्वराज्यात होता.

राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत मुघलांनी तो फितुरीने काबीज केला; पण लवकरच नावजी बलकवडे यांनी तो परत जिंकून घेतला आणि फितूर शोधून त्याला शासनही केले. इथून सूर्यास्त फारच सुंदर दिसतो, विशेषतः सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सोनकीची फुले फुलल्यावर तर हा भूलोकीचा स्वर्गच असल्याप्रमाणे भासतो. पायथ्याच्या गावात जेवायची सोय होऊ शकते.

कसे जाल?

पुण्याहून लोणावळ्याला जाऊन तिथून एसटीने जाता येते. बसच्या वेळा नीट पाहून जा, बस फेऱ्या कमी आहेत. लोणावळ्यातून जीप ठरवून जाता येते. पायथ्याहूनसुद्धा जीप मिळते.

पुण्याहून अंतर ९७ किमी.

काय पहाल?

वाटेवरची गुहा, गणेश मंदिर, दरवाजा, तटबंदी, कोराई देवीचे मंदिर, शंकराचे मंदिर, पाण्याची दोन तळी.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply