Konkan Biparjoy Effect: कोकणात समुद्र खवळला, अजस्त्र लाटांचं तांडव; समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद

Ratnagiri : बिपरजॉय चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नसला तरी देखील या चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. कोकणातल्या किनारपट्टी भागामध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. या वादळामुळे समुद्र खवळला असून लाटांचे तांडव सुरु आहे. त्यामुळे समुद्रकिनारी जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

येत्या काही तासांमध्ये बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आज काही तासांतच वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे गुजरात किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातल्या कोकणात सलग चौथ्या दिवशी समुद्र खवळलेला पाहायला मिळत आहे.या चक्रीवादळाचा कोकण  किनारपट्टीला धोका नाही. पण चक्रीवादळाचा प्रभाव मात्र दिसून येत आहे. साडेतीन ते पाच मीटर मीटरच्या उंचीच्या लाटांचे तांडव सुरु आहे.

या चक्रीवादळामुळे कोकणातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचसोबत मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. समुद्र खवळल्यामुळे मच्छीमारांनी समुद्र शांत होईपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात बोटी घेऊन जाऊ नये असे देखील आवाहन करण्यात आले आहे. तसंच, लाटा बघण्यासाठी पर्यटकांनी आणि नागरिकांनी समुद्राच्या जवळ जाऊ नये असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

दुसरीकडे, बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम गणपतीपुळे किनारपट्टीवर दिसून येत आहे. सलग दोन दिवस गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याला भरतीचा फटका बसत आहे. त्यामुळे हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. अजस्त्र लाटांनी समुद्रकिनारी पर्यटकांची दाणादाण उडाली आहे. या समुद्रकिनाऱ्यावरती साडेपाच मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येत आहेत. त्यामुळे पर्यटकांना समुद्रात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्याचसोबत जिल्हा प्रशासनाचे आदेश देखील जारी केले आहेत.

दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात रात्रीपासून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. बोईसर, चिंचणी, डहाणू, पालघर, कासा या परिसरात पहाटेपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकड्यामुळे हैराण झालेल्या पालघरकरांना दिलासा मिळाला आहे. तर जिल्ह्यात बहुतांश परिसरात रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply