Junnar APMC Result : जुन्नर बाजार समितीत माजी सभापती संजय काळे यांना बहुमत; १८ पैकी १३ जागा मिळाल्या

नारायणगाव - जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पुरस्कृत शिवनेर सहकार पॅनेलने अठरा पैकी १३ जागा जिंकून बाजार समितीची सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे दोन्ही गट व बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलला पाच जागा मिळाल्या.

निकाल दृष्टीक्षेपात येताच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांनी भांडाऱ्याची उधळण करत, शिवनेर सहकार पॅनेलचे प्रमुख, जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे यांना खांद्यावर घेऊन जल्लोष केला. तालुक्यातील सर्व पक्षीय विरोधक एकत्र येऊनही बाजार समितीची सत्ता काबीज करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. मतदारांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक स्व. शिवाजीराव काळे यांचे पुत्र संजय काळे यांच्यावर विश्वास ठेवून बाजार समितीची सत्ता त्यांच्या ताब्यात दिली.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा बँकेचे संचालक व पॅनल प्रमुख संजय शिवाजीराव काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवनेर सहकार पॅनेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, भाजप नेत्या आशा बुचके, माजी आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकरी परिवर्तन पॅनेल तयार करण्यात आला होता. संचालकांच्या १८ जागांसाठी पाच अपक्षांसह ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. रविवारी (ता. ३०) सकाळी आठ ते सायंकाळी चार दरम्यान मतदान झाले. त्या नंतर सायंकाळी सहा वाजता मतमोजणी सुरू झाली. एकूण ३ हजार २६४ मतदारांपैकी ३ हजार १८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. एकूण ९७.६१ टक्के मतदान झाले होते.

दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती .निवडणूक प्रचारात विरोधकांनी संजय काळे यांनाच टार्गेट केले होते. त्यांच्यावर गैरकारभाराचे आरोप केले होते.

काळे पराभुत होणार, बाजार समितीत परिवर्तन होणार अशी भविष्यवाणी माजी आमदार शरद सोनवणे यांनी व्यक्त केली होती. या मुळे निवडणूक चुरशीची होणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र मतदारांनी जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे यांच्या बाजूने कौल दिला. सोसायटी गटात सर्वाधिक ५२७ मते मिळवून काळे विजयी झाले.

● संजय काळे (शिवनेर सहकार पॅनेल प्रमुख) -

विरोधाकांनी खालच्या पातळीवर टीका केली. मात्र शेतकरी मतदार सुज्ञ आहेत. बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले निर्णय, केलेली विकास कामे याला साथ दिली. आमदार अतुल बेनके, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी भक्कम साथ दिली. मचे काही उमेदवार अल्प मतांनी पराभूत झाले.मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले जाईल.

 

●अतुल बेनके (आमदार) - सर्व विरोधक एकत्र येऊन सुद्धा त्यांना बहुमत मिळाले नाही.जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबर असल्याचे मतदारांनी दाखवले आहे. महाविकास आघाडी झाली असती तर आनंद झाला असता. पुढील निवडणुका महाविकास आघाडी करून लढवण्याचा प्रयत्न राहील.

● रघुनाथ लेंडे (शेतकरी विकास परिवर्तन पॅनेल प्रमुख) - माझा उमेदवारी अर्ज बाद झाला नसता तर चित्र वेगळे दिसले असते. बाजार समिती परिवर्त होणार अशी तालुक्यात चर्चा होती. मात्र थोड्या मतांनी आमचे काही उमेदवार पराभूत झाले.मोठ्या प्रमाणात बाद मते झाली. आमचे निवडून आलेले पाच उमेदवार सक्षम असून बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देतील.

■ शिवनेर सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार - विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गट - संजय काळे, निवृत्ती काळे, प्रकाश ताजणे, पांडुरंग गाडगे, नबाजी घाडगे, आरती वारुळे, विमल तळपे, तुषार थोरात, धोंडीभाऊ पिंगट

● ग्रामपंचायत मतदार संघ - प्रीतम काळे

● व्यापारी अडते मतदार संघ गट - सारंग घोलप, धनेश संचेती

● हमाल तोलरी गट - जितेंद्र कासार

■ शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार - विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदार संघ - ज्ञानेश्वर खंडागळे, संतोष चव्हाण.

● ग्रामपंचायत मतदार संघ - प्रियांका शेळके, भास्कर गाडगे,जनार्दन मरभळ



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply