Jayashree Thorat : “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर..”, बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना इशारा

Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी अनेक नेत्यांनी सभा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. आता निवडणुकीसाठी थोडे दिवस शिल्लक राहिल्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता या पार्श्वभूमीवर संगमनेर विधानसभा मतदारसंघातही राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी एका मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता आमदार होणंही अवघड झालं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री सोडा, आता ते आमदार तरी राहतात का?’, असा सवाल करत सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातांवर खोचक टीका केली होती. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखेंना इशारा देत हल्लाबोल केला आहे. “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर”, असं जयश्री थोरात यांनी म्हटलं आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात जयश्री थोरात बोलत होत्या.

Alibaug : पर्यटकांकडून महिलेची गाडीखाली चिरडून हत्या; रायगड जिल्ह्यातील घटना, आठपैकी तीन आरोपींना अटक

जयश्री थोरात काय म्हणाल्या?

“संगमनेर तालुक्याकडे वाकड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही. बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्याचा स्वाभीमान आहेत. खबरदार! माझ्या बापाविषयी तुम्ही काही बोलले तर. ज्यांना स्वत:चं घर सांभाळता येत नाही, ते आपलं घर काय सांभाळणार”, असा इशारा जयश्री थोरात यांनी माजी खासदार सुजय विखे यांना दिला आहे.

“तुमचं महायुतीचं सरकार जेव्हापासून आलं, तेव्हापासून त्रास चालू झाला. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी त्यांचं काही वाईट केलं नव्हतं. बाळासाहेब थोरात हे सर्वात जास्त काळ महसूलमंत्री राहिले आहेत. पण त्यांनी कधी कोणाचं वाटोळं केलं नाही. कोणालाही त्रास दिला नाही”, असं म्हणत जयश्री थोरात यांनी नाव न घेता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी संगमनेर विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे संगमनेरमधून महायुतीचा उमेदवार कोण असणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. दुसरीकडे बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये कायम आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. मात्र, आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी देखील सुजय विखे यांना सुनावल्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply