IPL 2024 : मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज! संजूच्या राजस्थानशी सामना

IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals : मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये आज (ता. २२) आयपीएलमधील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. राजस्थानचा संघ सहा विजय व १२ गुणांसह पहिल्या स्थानावर असून मुंबईच्या संघाला तीन विजयांसह फक्त सहा गुणांची कमाई करता आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसमोर राजस्थानला रोखण्याचे आव्हान असणार आहे.

राजस्थानच्या संघाने १ एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या आयपीएल लढतीत यजमान मुंबईचा सहा विकेट व २७ चेंडू राखून धुव्वा उडवला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी मुंबईचा संघ सज्ज झाला असेल. या लढतीत ट्रेंट बोल्ट व युझवेंद्र चहल यांनी मुंबईच्या डावाला खिंडार पाडले होते. त्यानंतर रियान परागच्या नाबाद ५४ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने दमदार विजय साकारला होता.

LSG Vs CSK : लखनौने सीएसकेला दिला पराभवचा धक्का; 8 विकेट्सनी जिंकला सामना

मुंबईच्या संघाकडून पहिल्या तीन लढतींमध्ये निराशाजनक कामगिरी झाली. सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला; पण या अपयशाला मागे टाकत मुंबईच्या संघाने मागील चार सामन्यांमधून तीन सामन्यांमध्ये विजय संपादन केले आहेत. मुंबईच्या या यशात जसप्रीत बुमरा या वेगवान गोलंदाजाचा सिंहाचा वाटा आहे. त्याने सात सामन्यांमधून १३ फलंदाज बाद केले आहेत. त्याने या दरम्यान ५.९६च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.

जेराल्ड कोएत्झी याने सात सामन्यांमधून १२ फलंदाज बाद केले आहेत; पण त्याच्या गोलंदाजीवर ९.९२च्या सरासरीने धावा काढण्यात आल्या आहेत. आकाश मधवाल, हार्दिक पंड्या या दोघांनाही गोलंदाजीत कमालीची सुधारणा करावी लागणार आहे. श्रेयस गोपालने तीन सामन्यांमधून तीन फलंदाज बाद केले आहेत. त्यालाही गोलंदाजीत मेहनत घ्यावी लागणार आहे.

रोहितवर फलंदाजी अवलंबून

मुंबईच्या फलंदाजीची मदार रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. त्याने सात सामन्यांमधून एका शतकासह २९७ धावा फटकावल्या आहेत. इशान किशन (१९२ धावा), तिलक वर्मा (२०८ धावा), हार्दिक पंड्या (१४१ धावा) यांना फलंदाजीत चमक दाखवावी लागणार आहे. सूर्यकुमार यादव अपेक्षेनुसार फलंदाजी करीत आहे. रोमारिओ शेफर्ड व टीम डेव्हिड यांच्याकडून अखेरच्या षटकांमध्ये दे दणादण फटकेबाजीची आशा आहे.

त्रिमूर्तीचा धडाकेबाज खेळ

राजस्थानचा संघ यंदा देदीप्यमान खेळ करीत आहे. पहिल्या सात सामन्यांमधून सहा सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवताना नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कर्णधार संजू सॅमसन (२७६ धावा), रियान पराग (३१८ धावा) व जॉस बटलर (२५० धावा) या तीन फलंदाजांकडून धावांचा पाऊस पडत आहे. जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर हे तीनही फलंदाज कशी कामगिरी करताहेत, हे पाहणे रंजक ठरणार आहे. यशस्वी जयस्वालचा सुमार फॉर्म त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे; पण त्याच्या सुमार खेळाचा फटका अद्याप राजस्थानला बसला नाही. रोवमन पॉवेल व शिमरोन हेटमायर हे दोन्ही वेस्ट इंडीजचे खेळाडू गरज असताना ठसा उमटवत आहेत.

युझवेंद्र, बोल्ट प्रभावी

राजस्थानचा गोलंदाजी विभागही तेवढाच भक्कम आहे. ट्रेंट बोल्ट (सात विकेट) व युझवेंद्र चहल (१२ विकेट) या दोन गोलंदाजांनी राजस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. आवेश खान (७ विकेट), नांद्रे बर्गर (६ विकेट), कुलदीप सेन (६ विकेट) यांच्याकडूनही समाधानकारक कामगिरी झालेली आहे. राजस्थानच्या प्रभावी गोलंदाजीसमोर मुंबईच्या फलंदाजांचा कस लागेल, हे निश्‍चित आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply