IPL 2022 : चेन्नईची आज पुन्हा अग्निपरीक्षा

नवी मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम संघ अपयशी ठरत आहेत. पाच वेळा स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्स तसेच चार वेळा स्पर्धा जिंकणारा चेन्नई सुपरकिंग्ज या दोन्ही संघांना सलग चार लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता रवींद्र जडेजाचा चेन्नई सुपरकिंग्जचा संघ आज नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर फाफ डुप्लेसीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सामना करील. (IPL 2022)

मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्ज हे दोन्ही संघ प्रत्येकी ४ पराभवांसह गुणतालिकेत तळाला आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाने मात्र सलामीच्या लढतीतील पराभवानंतर सलग तीन लढतींत विजय मिळवत ६ गुणांची कमाई केली आहे. याचाच अर्थ या संघातील खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्जसाठी उद्याचा पेपरही सोप्पा नसेल ही काळ्या दगडावरील रेघ आहे.

दीपक चहर हा चेन्नई सुपरकिंग्जचा प्रमुख गोलंदाज, पण दुखापतीमुळे त्याला अद्याप या मोसमात खेळता आलेले नाही, पण याचा फटका संघाला चांगलाच बसतो आहे. गोलंदाजी विभागात चेन्नई सुपरकिंग्जला त्याची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे.(Today IPL Match)

चेन्नईच्या संघात अष्टपैलू खेळाडूंची कमी नाही. कर्णधार जडेजा, मोईन अली, ख्रिस जॉर्डन, शिवम दुबे हे खेळाडू या संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावतात, पण यांच्यापैकी एकालाही अद्याप मोठी कामगिरी बजावता आलेली नाही. या खेळाडूंनी दबावाखाली आपला खेळ उंचावण्याची गरज आहे. तसेच ऋतुराज, रायुडू या फलंदाजांनीही मदतीला धावून यावे लागणार आहे. फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी यांनी कर्णधार म्हणून जडेजा याची पाठराखण केली असून लवकरात लवकर संघाला विजय मिळतील, अशी आशाही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.(IPL 2022 today IPL Match 2022 CSK vs RCB)

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने चारपैकी तीन सामने जिंकले असून ते सध्या चौथ्या स्थानावर आहेत. मात्र चेन्नईने चारपैकी चारही सामने गमावल्यामुळे ते सर्वात शेवटच्या म्हणजे १० व्या स्थानावर आहे. चार वेळा आयपीएल जिंकणाऱ्या या संघाची पहिले चारही सामने गमावण्याची परिस्थिती पहिल्यांदाच झाली आहे.

आजची आयपीएल लढत

चेन्नई सुपरकिंग्ज - रॉयल चॅलेंजर्स बंगळूर

डी. वाय. पाटील स्टेडियम रात्री ७.३० वाजता



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply