IND vs ENG 2nd Semifinal : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ३५ वर्षांनंतर दुसऱ्यांदा आमनेसामने, पाहा दोन्ही संघाची आकडेवारी

भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. हा सामना अॅडलेड क्रिकेट मैदानावर दुपारी १:३० वाजता सुरुवात होणार आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा संघ २००९ नंतर प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला. अशा परिस्थितीत टीम इंडिया २०१४ नंतर प्रथमच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी उतरणार आहे.

२०१४ मध्ये भारतीय संघाला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना अॅडलेड ओव्हलवर होणार आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत दोन टी-२० सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. २०१६ मध्ये भारताने येथे ऑस्ट्रेलियाचा ३७ धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी या विश्वचषकात बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला.

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारत आणि इंग्लंड २२ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने १२ सामने जिंकले, तर इंग्लंडच्या संघाने १० सामने जिंकले आहेत. भारत आणि इंग्लंड संघ १९८७ नंतर (३५ वर्षांनंतर) प्रथमच जागतिक (वनडे/टी-२०) उपांत्य फेरीत भिडतील. दोन्ही संघ प्रथमच टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भिडत आहेत. त्याच वेळी, दोन्ही संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोनदा (१९८३ आणि १९८७) आमनेसामने आले आहेत. एक सामना भारताने तर एक सामना इंग्लंडने जिंकला होता.

टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ तीनदा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताने दोन सामने जिंकले, तर एका सामन्यात इंग्लंडचा संघ विजयी झाला. यावेळी दोन्ही संघ तटस्थ ठिकाणी आमनेसामने आहेत. भारत आणि इंग्लंड दोनदा तटस्थ मैदानावर आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply