IPL 2024 RCB vs SRH : बंगळूरकडून हैदराबादला धक्का ; सहा पराभवांनंतर विजयाला गवसणी

Hyderabad: विराट कोहली (५१ धावा), रजत पाटीदार (५० धावा) यांची दमदार अर्धशतके, कॅमेरुन ग्रीनचा (नाबाद ३७ धावा, २/१२) शानदार अष्टपैलू खेळ आणि कर्ण शर्माच्या प्रभावी फिरकी गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद संघाला ३५ धावांनी पराभवाचा धक्का दिला. तब्बल सहा पराभवांनंतर बंगळूरने यंदाच्या आयपीएल मोसमात विजय साकारला. हैदराबादच्या संघाला चार विजयांनंतर पराभवाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, याआधी बंगळूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली व फाफ ड्युप्लेसी या अनुभवी जोडीने ४८ धावांची भागीदारी करीत आश्‍वासक सुरुवात करून दिली. टी. नटराजनच्या गोलंदाजीवर ड्युप्लेसी २५ धावांवर बाद झाला. त्यानंतर मयांक मार्कंडेने विल जॅक्सला सहा धावांवर बाद करीत बंगळूरला दुसरा धक्का दिला. कोहली व रजत पाटीदार या जोडीने ६५ धावांची भागीदारी करताना बंगळूरच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. पाटीदार याने मागील चार सामन्यांमधून तीन अर्धशतके झळकावली. तो फॉर्ममध्ये आला. मात्र, त्याला मोठी खेळी अद्याप करता आलेली नाही. जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर तो ५० धावांवर बाद झाला. त्याने २० चेंडूंमध्ये दोन चौकार व पाच षटकार फटकावले.

14 कोटीच्या खेळाडूने CSK ची वाढवली डोकेदुखी, लखनौविरुद्धच्या पराभवानंतर कोच स्पष्ट बोलला

विराट कोहलीने यंदाच्या मोसमातील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने ४३ चेंडूंमध्ये ५१ धावा करताना चार चौकार व एक षटकार मारला. उनाडकटच्याच गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यानंतर कॅमेरुन ग्रीन (नाबाद ३७ धावा) याने आक्रमक फलंदाजी करीत बंगळूरला २०६ धावांपर्यंत नेले. त्याने २० चेंडूंमध्ये पाच चौकार मारले. हैदराबादकडून उनाडकटने ३० धावा देत तीन फलंदाज बाद केले. नटराजनने ३९ धावा देत दोन फलंदाज बाद केले.

फिरकीसमोर दिग्गज ढेपाळले

बंगळूरकडून २०७ धावांचे आव्हान हैदराबादसमोर ठेवण्यात आले; पण विल जॅक्स, स्वप्निल सिंग व कर्ण शर्मा या फिरकी गोलंदाजांपुढे हैदराबादचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. पहिल्याच षटकात जॅक्सने जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या ट्रॅव्हिस हेडला कर्णकरवी झेलबाद केले. अभिषेक शर्माने नेहमीच्या शैलीत ३१ धावा केल्या; पण तो खेळपट्टीवर स्थिरावणार असे वाटत असतानाच यश दयालने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

त्यानंतर एडन मार्करम (७ धावा), हेनरिक क्लासेन (७ धावा), नितिशकुमार रेड्डी (१३ धावा), अब्दुल समद (१० धावा) यांच्याकडून सपशेल निराशा झाली. त्यामुळे हैदराबादची अवस्था पाच बाद ६९ धावा अन्‌ नंतर सहा बाद ८५ धावा अशी झाली. त्यानंतर शाहबाज अहमदने नाबाद ४० धावांची खेळी केली. हैदराबादला आठ बाद १७१ धावांपर्यंत मजल मारता आली. कर्ण शर्मा, स्वप्निल सिंग व कॅमेरुन ग्रीन यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर - २० षटकांत ७ बाद २०६ धावा (विराट कोहली ५१, रजत पाटीदार ५०, कॅमेरुन ग्रीन नाबाद ३७, जयदेव उनाडकट ३/३०, टी. नटराजन २/३९) विजयी वि. सनरायझर्स हैदराबाद २० षटकांत ८ बाद १७१ धावा (अभिषेक शर्मा ३१, शाहबाज अहमद नाबाद ४०, पॅट कमिन्स ३१, कॅमेरुन ग्रीन २/१२, कर्ण शर्मा २/२९).

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply