IPL 2024 CSK vs SRH : हैदराबादकडून चेन्नईचा पराभव ; एडन मार्करमची दमदार अर्धशतकी खेळी,अभिषेक शर्माची आक्रमक खेळी

Hyderabad : पॅट कमिन्सच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने शुक्रवारी गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सचा सहा विकेट राखून पराभव केला. एडन मार्करम (५० धावा) याची दमदार अर्धशतकी खेळी, अभिषेक शर्माची १२ चेंडूंतील ३७ धावांची आक्रमक खेळी आणि कमिन्स, भुवनेश्‍वरकुमार व जयदेव उनाडकट या अनुभवी गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर हैदराबादने चेन्नईला नमवले. हैदराबादचा आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील हा दुसरा विजय ठरला. चेन्नईला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

चेन्नईकडून हैदराबादसमोर १६६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी ४६ धावांसह आक्रमक सुरुवात केली. अभिषेकची या मोसमातील धडाकेबाज फलंदाजी या लढतीतही कायम राहिली. त्याने १२ चेंडूंमध्ये तीन चौकार व चार षटकारांसह ३७ धावांची खेळी केली. दीपक चहरच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यानंतर हेड व एडन मार्करम या परदेशी जोडीने ६० धावांची भागीदारी करताना हैदराबादच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. माहिश तीक्षणाने हेडला ३१ धावांवर बाद केले.

IPL 2024: पंजाब किंग्सचा रचला इतिहास, आजपर्यंत जगातील कोणत्याच संघाला न जमलेला केला पराक्रम

एडन मार्करम व शाहबाज अहमद या जोडीने हैदराबादची झुंज कायम ठेवली. मार्करमला या लढतीत सूर गवसला. त्याने ३६ चेंडूंमध्ये चार चौकार व एक षटकारासह ५० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली; पण मोईन अलीच्या गोलंदाजीवर तो पायचीत बाद झाला. त्यानंतर अली याने शाहबाज यालाही १८ धावांवर पायचित बाद केले; मात्र हैदराबादचा संघ यामुळे बिथरला नाही. हेनरिच क्लासेन (नाबाद १० धावा) व नितीश रेड्डी (नाबाद १४ धावा) यानी हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राचिन रवींद्र व ॠतुराज गायकवाड या सलामी जोडीने २५ धावांची भागीदारी केली. भुवनेश्‍वरकुमारने रवींद्रला; तर शाहबाज अहमदने ॠतुराजला बाद करीत हैदराबादसाठी मोलाची कामगिरी बजावली.

मुंबईकर फलंदाजांची भागीदारी

अजिंक्य रहाणे व शिवम दुबे या मुंबईकर फलंदाजांनी ६५ धावांची भागीदारी रचली. शिवमने या भागीदारीत आक्रमक फलंदाजी केली. रहाणेकडून म्हणावी तशी फलंदाजी झाली नाही. पॅट कमिन्सने ४५ धावा करणाऱ्या शिवमला बाद करीत जोडी तोडली. त्यानंतर ३५ धावा करणारा रहाणे उनाडकटच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवींद्र जडेजाने नाबाद ३१ धावांची खेळी करीत चेन्नईला २० षटकांत ५ बाद १६५ धावा उभारून दिल्या. भुवनेश्‍वरकुमार, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट या गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट मिळवला.

संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपरकिंग्स २० षटकांत ५ बाद १६५ धावा (अजिंक्य रहाणे ३५, शिवम दुबे ४५, भुवनेश्‍वरकुमार १/२८, पॅट कमिन्स १/२९) पराभूत वि. सनरायझर्स हैदराबाद १८.१ षटकांत ४ बाद १६६ धावा (एडन मार्करम ५५, अभिषेक शर्मा ३७, मोईन अली २/२३).



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply