HSRP Number Plate : नंबर प्लेटसाठी केव्हा येणार ‘नंबर’! पुण्यातील २६ लाख वाहनांसाठी लागतील तब्बल ७२ वर्षे

Pune : पुणे - वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) दिलेल्या मुदतीत बसविण्यासाठी पुण्यातील विविध केंद्रांवर वाहनधारकांची गर्दी होत आहे. केंद्रांची संख्या वाढवून १२६ करण्यात आली असली, तरी नंबर प्लेट बसविण्याचा वेग हा कमी आहे. दिवसाला केवळ एक हजार वाहनांना नंबर प्लेट बसविली जात आहे.

पुण्यात २६ लाख ३३ हजार ६३५ वाहने यासाठी पात्र आहेत तर, अंतिम तारीख ३० एप्रिल आहे. अवघ्या ४८ दिवसांत २६ लाख वाहनांना नंबर प्लेट बसविणे अशक्य आहे. सध्याचा वेग गृहीत धरला तर पुण्यातील वाहनांना नंबर प्लेट बसविण्यासाठी आणखी किमान ७२ वर्षे लागू शकतात.

Virar Crime : हत्या करुन मुंडकं सुटकेसमध्ये, विरारमधील 'त्या' हत्येचा उलगडा; एका पाकिटामुळे गेम झाला

पुण्यातील वाहनांची संख्या ४० लाख आहे. पैकी २६ लाख वाहने हे एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेली आहेत. या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. सध्या पुण्यात नंबर प्लेटसाठी १२६ केंद्रे कार्यरत आहेत. मात्र या केंद्रांवर कामांचा बोजवारा उडाला आहे. हा प्रवास ऑनलाइन नोंदणीत होणाऱ्या अडचणी पासून ते केंद्र बंद पर्यंतचा आहे. त्यामुळे वाहनधारकांची इच्छा असून देखील वाहनांना नंबर प्लेट बसविण्याचा वेग हा अत्यंत कमी आहे.

वेग वाढविणे गरजेचे

पुण्यात पात्र वाहनांपैकी ३४ हजार ३५६ वाहनांना प्रत्यक्षात नंबर प्लेट बसविण्यात आली आहे तर ६७ हजार ५८६ वाहनाची नोंदणी झाली आहे. (ही आकडेवारी ११ मार्च पर्यंतची आहे) दिवसाला केवळ हजार वाहनांना जर नंबर प्लेट बसविली जात असेल तर उद्दिष्ट गाठण्यासाठीचा हा वेग अत्यंत कमी आहे. पुण्यात केंद्राची संख्या वाढविणे गरजेचे आहे. शिवाय वाहनांची नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ व जलद करण्याची नितांत गरज आहे.

दररोज हजार वाहनांनाच नंबर प्लेट

पुण्यात दररोज सुमारे एक हजार वाहनांना नंबर प्लेट बसविली जात आहे. पात्र वाहनांची संख्या २६ लाख हून जास्त आहे. रोज एक हजार वाहने या प्रमाणे विचार केला तर २६ लाख ३३ हजार ६३५ वाहने पूर्ण होण्यासाठी २६ हजार ३३६ दिवस लागतील.

शिवाय हे केवळ पुणे आरटीओ कार्यालयात नोंद झालेली वाहनांच्या संख्ये बद्दल आहे. पुण्यात दुसऱ्या शहरातून नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या देखील जास्त आहे. अशा लोकांच्या वाहनांचा इथे विचार झालेला नाही. त्याचा विचार झाल्यास वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

  • १००० - वाहनांना दररोज नंबर प्लेट बसविली जात आहे
  • २६,३३,६३५ - पुण्यातील पात्र वाहनांची संख्या
  • १२६ - नंबर प्लेट बसविण्यासाठीची केंद्रे
  • ३० एप्रिल - अंतिम मुदत

पुण्यात सुरुवातीला ६९ केंद्रे होती. त्यात वाढ करण्यात आली आहे. शिवाय केंद्र बंद करण्यात येऊ नये, असे आदेश देखील देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास केंद्रांची संख्या आणखी वाढवली जाईल.

- स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply