HSC Exam 2026 : विद्यार्थ्यांनो, शुभेच्छा! आजपासून बारावीची परीक्षा सुरू; राज्यभर 15 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार

Mumbai/Pune : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज, मंगळवारी १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेला १० हजार ६६४ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील १५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसणार आहेत. यंदा परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत २७ हजारांनी वाढ झाली आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये आठ लाख २० हजार २२९ मुले, सात लाख १२ हजार २४० मुली, तर १८ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान विषयासाठी दोन लाख ३६ हजार ३२०, तर सामान्य ज्ञान विषयासाठी एक हजार ७०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी परीक्षेसाठी एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.विद्यार्थ्यांनी केवळ राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेले आणि छापील वेळापत्रकच ग्राह्य धरावे. यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांची अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या ९ जानेवारीच्या सरकारी निर्णयानुसार परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवणे, तसेच परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी जिल्हा दक्षता समितीवर राहणार आहे, अशी माहिती डॉ. बेडसे यांनी दिली.

कर्मचाऱ्यांची अदलाबदल
राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य आहे. मात्र, १७२ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्याने त्या केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही नसलेली सर्वाधिक, ५५ केंद्र अमरावती मंडळात आहेत. तर २४८ परीक्षा केंद्रे संवेदनशील आहेत.

गैरप्रकार रोखण्यासाठी गुगल मीट, झूमचा वापर
दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी जिल्हा दक्षता समितीच्या अध्यक्षांना आवश्यक नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात सीसीटीव्ही नसलेल्या काही केंद्रांवर गुगल मीट आणि झूम प्रणालीचा वापर केला जाणार आहे. भरारी पथकांना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विभागीय मंडळांतर्गत विशेष व बैठी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. बैठे पथक असतानाही, उपद्रव झाल्यास संबंधित केंद्रावरील, तसेच पथकातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले.

विभागीय मंडळनिहाय विद्यार्थी संख्या
पुणे : २,६०,०१४
नागपूर : १,६०,५३०
छत्रपती संभाजीनगर : १,९१,४९३
मुंबई : ३,५२,७१८
कोल्हापूर : १,१६,६११
अमरावती : १,५६,९१५
नाशिक : १,७३,६५१
लातूर : ९६,५४२
कोकण : २४,०१३

शाखानिहाय विद्यार्थीसंख्या
कला ३,८०,६९२
वाणिज्य : ३,२०,१५२
विज्ञान : ७,९९,७७३
व्यावसायिक अभ्यासक्रम : २७,३७८
आयटीआय ४,४९२

परीक्षा पारदर्शक व गैरप्रकारमुक्त व्हावी, यासाठी राज्यभरात २७१ भरारी पथकांसह कॉपीमुक्त अभियानांतर्गत विविध उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. - नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य मंडळ



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *