Girish Bapat Funeral: खासदार गिरीश बापट अनंतात विलीन! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुण्यातील भाजप खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. गिरीष बापट गंभीर आजाराने त्रस्त होते.गेल्या दीड वर्षांपासून ते आजारी होते. बापटांच्या निधनाची बातमी भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. त्याचं पार्थिव शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अंत्यदर्शनासाठी सर्व राजकीय पक्षातील जेष्ठ नेते, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

बापटांच्या अंत्यदर्शनासाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सर्वसमावेशक नेता आणि भाऊ अशी त्यांची ओळख होती आणि पुण्यात त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. त्यांनी अनेक नेते घडविले, ते नगरसेवक, आमदार, खासदार मंत्री झाले तरी देखील सामान्यांशी असलेली नाळ त्यांनी कधीच तोडली नाही.

अखेर आज त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यातील भाजपचे दिग्गज नेते हजर होते. हजारो कार्यकर्ते पाणावलेल्या डोळ्यांनी 'गिरीश बापट अमर रहे', अशा घोषणा देत होते. गिरीश बापट यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून आणि नात असा परिवार आहे.

गिरीश बापटांच्या निधनावर 'या' नेत्यांनी व्यक्त केल्या भावना

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री- खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, कणखर आणि मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्वसमावेशक नेतृत्व हरपले आहे. तसेच, भाजपचेच नव्हे तर समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्यात भाजप वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान होते. विरोधकांनाही आपलेसे करण्याची गिरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी सर्वांनाच मदत केली.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री- खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. पुण्याच्या जडणघडणीत त्यांचा वाटा मोठा आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सलग पाच वेळा आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम पुणे कधी विसरु शकणार नाही. पक्षाच्या भिंतीपलीकडचे त्यांचे सर्व नेत्यांशी, पक्षांशी, समाजाशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.

वंदना चव्हाण, खासदार- राष्ट्रवादी काँग्रेस- गिरीश बापट कामगार नेता ते खासदार असा प्रेरणादायी राजकीय प्रवास. सर्वसामान्य व्यक्ती ज्यांच्यापर्यंत सहज पोहचू शकेल असा खासदार. दांडगा जनसंपर्क, राजकारणातील मुत्सद्दी तरीही सर्व राजकीय पक्षातील लोकांशी राजकारणापलीकडील मैत्री जपणारा दिलदार मित्र, भावपूर्ण श्रद्धांजली.

अनिल शिरोळे, माजी खासदार- गिरीशराव बापट म्हणजे पुण्यातील भाजपचा चेहरा. ते अत्यंत मनमिळाऊ होते. सर्व राजकीय पक्षांमधील आणि समाजातील सर्व स्तरांमधील नेते, कार्यकर्त्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. निवडणूक कशी लढवावी आणि कशी जिंकावी, हे त्यांच्याकडून शिकावे. त्यांच्या निधनामुळे समाजाची आणि पक्षाची मोठी हानी झाली आहे.

मोहन जोशी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी- माझे मित्र गिरीश बापट यांच्या निधनाने दुःख झाले. नगरसेवक, आमदार, मंत्री ते खासदार अशा राजकीय वाटचालीत त्यांनी कार्यकर्त्याचा पिंड सोडला नाही. राजकीय स्पर्धेत विरोधी पक्षांशी वितुष्ट असू नये, ही राजकारणातील चांगली भावना त्यांनी जपली. शहराच्या विकासात त्यांनी राजकारण आणले नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणारा आनंदी वृत्तीचा उमदा मित्र हरपला.

रवींद्र धंगेकर, आमदार, कसबा मतदारसंघ- राजकीय प्रवासात समविचारी सर्वांना सोबत घेऊन काम केले. राजकीय स्तर कसा टिकवायचा हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत मी विधानसभेत काम करेन. पक्ष चुकेल तेव्हा ते सूचना द्यायचे. जे समाजात बोलायचे तेच पक्षात बोलायचे. सर्व समाज त्यांच्यासोबत होता. त्यांचे काम पुढे घेऊन जाणे हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply