Mumbai : जी-२० व्यापार, गुंतवणूक कार्यगटाची आजपासून मुंबईत बैठक, रस्त्यावर रोषणाई

मुंबई - मुंबईत पुन्हा जी २० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, बुधवार व गुरुवार या तीन दिवसीय व्यापार व गुंतवणूक बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीला देशविदेशातील प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.

या पार्श्वभूमीवर वांद्रे, सांताक्रुझ, वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड, मिठी नदी आदी ठिकाणचा परिसर चकाचक केला जातो आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या कामांची महापालिका आयुक्त डॉ इकबाल सिंग चहल यांनी सोमवारी पहाणी केली.

जी - २० परिषदेच्या व्यापार व गुंतवणूक समूहाची बैठक मुंबईत मंगळवार, २८ ते गुरुवार ३० मार्च २०२३ या कालावधीत होत आहे. या निमित्ताने महापालिकेने केलेल्या तयारीचा आढावा घेत चहल यांनी संबंधित विभागांना कामे पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले आहेत. जी-२० परिषदेची पहिली बैठक मुंबईत डिसेंबर २०२२ मध्ये झाली होती.

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून जगात प्रसिद्ध असून जी-२० परिषदेच्या विविध गटांच्या बैठका मुंबईत होणार आहेत. यानिमित्ताने मुंबईचे पर्यायाने महाराष्ट्राचे ठळक स्थान जी- २० बैठकांवेळी अधोरेखित व्हावे, म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

जी २० व्यापार आणि गुंतवणूक गटाच्या बैठकीआधी बृहन्मुंबई महानगरपालिकेने बैठकीची ठिकाणे व अभ्यागत राहणार असलेल्या हॉटेल्स् परिसरांमध्ये सुशोभीकरण, स्वच्छता यादृष्टीने विशेष कामे करण्यात आली आहेत.

ग्रॅण्ड हयात हॉटेल (सांताक्रुझ) ते ताज लॅण्ड्स एण्ड (वांद्रे) परिसर यासह सांताक्रूझ, कलिना परिसर, कलानगर, वांद्रे-कुर्ला संकूल, मिठी नदी परिसर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभाग कार्यालय परिसर, वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड परिसर आदी परिसरांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व ठिकाणच्या कामांची पाहणी करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दौरा सकाळी केला.

अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सहआयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उपायुक्त (विशेष) संजोग कबरे, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनिष वाळंजू आदी अधिका-यांसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सह आयुक्त रामामूर्ती देखील या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.

विद्युत रोषणाई, सुंदर व स्वच्छ रस्ते

जी- २० बैठकांच्या परिसरांमध्ये रस्त्यांची देखभाल आणि दुरूस्तीच्या अतिरिक्त कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच उद्यान विभागाने ठिकठिकाणी हरित सुशोभिकरण केले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने सर्व परिसरांत विशेष मोहीम राबवून स्वच्छतेची कामे पूर्ण केली आहेत. ठिकठिकाणी चौकांमध्ये तसेच पथदिव्यांच्या खांबांवरही रोषणाई करण्यात आली आहे. या सर्व कामांची पाहणी करताना आयुक्तांनी संबंधितांना आवश्यक ते निर्देश देखील दिले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply