England vs India 3rd ODI : प्रतिक्षा संपली! निर्णायक सामन्यात पंतने ठोकले एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने आपल्या खिशात घातली आहे. यष्टीरक्षक ऋषभ पंतचे धमाकेदार शतक आणि हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर भारताने मँचेस्टर येथील निर्णायक सामना पाच गडी राखून जिंकला. यष्टीरक्षक ऋषभ पंतने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. यासाठी त्याला २७सामन्यांची वाट बघावी लागली. यापूर्वी त्याने पाच अर्धशतके केली होती.

इंग्लंडने दिलेले २६० धावाचे लक्ष्य पार करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सलामीची फळी पुन्हा सपशेल ढेपाळली. मात्र, यष्टीरक्षक ऋषभ पंतने हार्दिक पंड्याच्या सहकार्याने भारतीय डावाला आकार दिला. दोघांनी मिळून १३३ धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्याने ५५ चेंडूत ७१ धावा केल्या. हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंतने भारताला विजयी शेवट करून दिला.

या दरम्यान पंतने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक साजरे केले. त्याने ११३ चेंडूंमध्ये नाबाद १२५ धावांची खेळी केली. त्यामध्ये १६ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होतो. डेव्हिड विलीने फेकलेल्या ४२व्या षटकामध्ये पंतने सलग पाच चौकार फटकावले. आशियाबाहेर शतक ठोकणारा तो भारताचा तिसराच यष्टीरक्षक ठरला आहे. त्यापूर्वी, राहुल द्रविडने (१९९९) आणि केएल राहुलने (२०२०) अशी कामगिरी केली होती.

आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक साजरे करण्यासाठी पंतला २७ डावांची वाट बघावी लागली. असे असले तरी त्याचे हे शतक निर्णायक सामन्यात झाले. विशेष म्हणजे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ठोकलेली पाचही शतकं सुद्धा निर्णायक सामन्यांमध्ये झालेली आहेत. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply