Eknath Shinde Ram Mandir Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सायंकाळी अयोध्येला पोचले. या दौऱ्यात ते राममंदिराच्या निर्मितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे रविवारी दुपारी रामलल्लाचे दर्शन घेऊन तेथील महाआरतीत सहभागी होणार आहेत.

अयोध्येत मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शरयूच्या काठावर महाआरती करून या दौऱ्याची सांगता होणार आहे. त्यानंतर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.

शिंदे यांचे शिवसैनिक विशेष गाडीने एक दिवस आधीच अयोध्येला पोहोचले आहेत. भाजपचे नेतेही दौऱ्यात सहभागी झाले असून मुख्यमंत्र्यांसोबत भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि आमदार संजय कुटे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

गिरीश महाजन आणि संजय कुटे, राम शिंदे हे थेट अयोध्येला पोहोचणार असून राधाकृष्ण विखे- पाटील हे उद्या (ता.९) लखनौहून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी होतील. अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत जगतगुरू परमहंस आचार्य मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार आहेत.

तपस्वी छावणीकडून स्वागत

काँग्रेससोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या विचारापासून दुरावले असल्याचा आरोप करत महंत परमहंस यांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. ‘बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. ते अयोध्येत येत असल्यामुळे साधू-संतांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तपस्वी छावणीचे शिष्य मुख्यमंत्री शिंदेंचे स्वागत करणार आहेत, असे परमहंस यांनी म्हटले आहे.

अयोध्येत आम्ही उत्साहाने जात आहोत, तिथे खूप चांगली आणि उत्साहाने तयारी होते आहे. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अनेकजण चालले आहेत. कुणी ट्रेनने जाते आहे, कुणी विमानाने जाते आहे. आम्ही रामलल्लाचे दर्शन घ्यायला जातो आहोत त्यावरही विरोधक टीका करत आहेत.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply