Donald Trump : “दिलेलं वचन पूर्ण केलं”, सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया; एलॉन मस्क यांना म्हणाले…

Sunita Williams Homecoming Donald Trump Reacts : अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर हे दोघे नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आले आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांचे स्पेस कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्रात उतरले. सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर हे अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेवर अंतराळात गेले होते. मात्र, त्यांच्या बोईंग स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना २८६ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) येथे घालवावे लागले.

या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाने उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या खासगी अंतराळ संशोधन कंपनीबरोबर मिळून मोहीम आखली होती. या मोहिमेला यश आलं आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या यशस्वी मोहिमेनंतर नासा व स्पेसएक्सचं अभिनंदन केलं आहे. तसेच एलॉन मस्क यांचे आभार मानले आहेत.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

व्हाइट हाऊसने (अमेरिकेच्या अध्यक्षांचं निवासस्थान व कार्यालय) म्हटलं आहे की “अंतराळवीर फ्लोरिडाच्या समुद्रात सुरक्षितपणे उतरले आहेत, त्यांच्या सुरक्षित परतीचे श्रेय एलॉन मस्क यांना द्यायला हवं. वचन दिलं होतं जे पूर्ण केले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी नऊ महिने अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना वाचवण्याचं वचन दिलं होतं. आज, ते अमेरिकेच्या आखातात सुरक्षितपणे उतरले आहेत. एलॉन मस्क, स्पेसएक्स आणि नासाचे आभार!”

सुनीता विल्यम्स (५९) या त्यांचे सहकारी बुच विल्मोर, निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांच्यासह स्पेसएक्स क्रू-९ ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांचे स्पेस कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्रात तल्लाहास्सी येथे सुरक्षितपणे उतरले. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथील लाँच कॉम्प्लेक्स ३९ए (एलसी-३९ए) वरून फाल्कन ९ यानाने ड्रॅगन स्पेसक्राफ्ट लाँच केले होते, ज्यामधून हेग आणि गोर्बुनोव्ह हे स्पेस स्टेशनवर गेले होते अशी माहिती स्पेसएक्सने दिली आहे.

अंतराळवीरांनी दाखवून दिलंय की चिकाटी कशी असते : नरेंद्र मोदी

दरम्यान, या ऐतिहासिक घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मोदी म्हणाले, “क्रू ९ तुमचं स्वागत आहे. पृथ्वीने तुमची खूप आठवण काढली. त्यांच्यासाठी (सुनीता आणि बुच) ही धैर्याची, धाडसाची परीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि Crew9 अंतराळवीरांनी पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिले आहे की चिकाटीचा खरा अर्थ काय असतो. विशाल अवकाशासमोर त्यांचा अढळ दृढनिश्चय लाखो लोकांना कायम प्रेरणा देईल.”

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply