Devendra Fadnavis : गहिनीनाथ गडाने मला दत्तक घ्यावे, देवेंद्र फडणवीसांचे बीडमधून मोठे विधान

CM Devendra fadanvis : बीड जिल्हाचे आणि आमचे नाते वेगळे आहे. ताई आणि महाराजांनी मला सांगितले की, तुम्ही गहिनीनाथ गडाला दत्तक घ्या..पण माझे म्हणणे आहे की, गडाने मला दत्तक घ्यावे. गहिनीनाथ गड दत्तक घेण्याची माझी ऐपत आणि औकातही नाही. मी गडाला दत्तक घ्यायला तयार आहे, तुम्ही मला दत्तक घ्या आणि गडाची जबाबदारी निश्चितपणे पार पाडू.आपण सर्व मिळून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा निर्माण करू,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गहिनीनाथ गडाच्या विकासाबाबत बोलताना फडणवीस यांनी माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादाने बीडशी विशेष नाते जोडले गेल्याचे सांगितले. फडणवीस म्हणाले, “बीड जिल्हा अनेक अडचणींचा सामना करत असला, तरी भक्तीच्या रसात न्हाऊन निघतो. वारकरी संप्रदायाने कधीही जात, धर्म किंवा भेदभावाला थारा दिला नाही. गहिनीनाथ गडावर येणारा प्रत्येकजण फक्त भक्त बनतो.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आयोजित सप्ताह सोहळ्यात आपले विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी बीडच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे महत्त्व, गहिनीनाथ गडाच्या विकासाचे प्रयत्न आणि मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प

बीड आणि मराठवाड्याच्या दुष्काळाच्या समस्येवर मात करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. “बीड सातत्याने दुष्काळाच्या सावटाखाली आहे. आम्ही कृष्णेचे पाणी बीडपर्यंत आणण्याचा निर्णय घेतला आहे. आज हे पाणी आष्टीपर्यंत पोहोचले आहे, पण ते संपूर्ण जिल्ह्याला मिळाले पाहिजे,” असे ते म्हणाले. तुमचे हक्काचे पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे आणि मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे काम हे सरकार करून दाखवेल. “या पिढीने दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीने दुष्काळ पाहू नये, असा माझा संकल्प आहे. संत वामन भाऊ यांचा आशीर्वाद या कार्यासाठी पाठीशी आहे,” असे त्यांनी नमूद केले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply