DC vs MI : आता ‘प्ले-ऑफ’साठी रस्सीखेच! पंतला पाचव्या विजयाची आस; सहावा पराभव टाळण्यासाठी पांड्याचा काय आहे प्लॅन?

 

Delhi Capitals vs Mumbai Indians : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा उत्तरार्ध सुरू झाला असून ‘प्ले-ऑफ’मध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्न करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये उद्या (ता. २७) लढत रंगणार आहे.

यापुढील लढतींमधील एक पराभवही पाय खोलात नेऊ शकतो. त्यामुळे मुंबई-दिल्ली यांच्यामधील लढत रोमहर्षक ठरण्याची दाट शक्यता आहे. मुंबईचा संघ सहावा पराभव टाळण्यासाठी, तर दिल्लीचा संघ पाचव्या विजयाला गवसणी घालण्यासाठी मैदानात उतरेल.

रोहित शर्मा (३०३ धावा), तिलक वर्मा (२७३ धावा), इशान किशन (१९२ धावा) यांनी मुंबईसाठी धावा फटकावल्या आहेत; पण रोहित, तिलक व इशान या तिघांना सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. सूर्यकुमार यादव (१४० धावा) याने पुनरागमन केल्यानंतर चमक दाखवली आहे, पण त्याच्याकडून आणखी मोठ्या अपेक्षा आहेत.

Team India Squad T20 WC24 : टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघातून हार्दिक पांड्याला डच्चू? राहुल, सॅमसनसह 'या' खेळाडूंवर नजर

हार्दिक पंड्या, टीम डेव्हिड व रोमारिओ शेफर्ड यांच्याकडून मुंबई संघाच्या आशा पूर्ण झालेल्या नाहीत. मुंबईसाठी आगामी सहा लढती अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. त्यामुळे फलंदाजी विभागात खेळ उंचवावा लागणार आहे.

मुंबईच्या संघाला गोलंदाजी विभागात सपशेल अपयशाचा सामना करावा लागला आहे. जसप्रीत बुमरा (१३ विकेट) वगळता एकाही गोलंदाजाला ठसा उमटवता आलेला नाही. जेराल्ड कोएत्झी याने १२ फलंदाज बाद केले आहेत, पण त्याच्या गोलंदाजीवर १० च्या सरासरीने धावा काढण्यात आल्या आहेत. आकाश मधवाल, हार्दिक पंड्या, पियूष चावला, श्रेयस गोपाल, रोमारिओ शेफर्ड यांना प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखता आलेले नाही. बुमरा अँड कंपनीला उद्या रिषभ पंतच्या सेनेला रोखण्याचे काम करावे लागणार आहे.

रिषभ पंतचा फॉर्म महत्त्वाचा

दिल्लीसाठी कर्णधार रिषभ पंतचा फॉर्म महत्त्वाचा ठरत आहे. त्याने नऊ सामन्यांमधून ३४२ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. ट्रिस्टन स्टब्स (२२५ धावा), पृथ्वी शॉ (१८५ धावा) यांनीही समाधानकारक फलंदाजी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज जेक फ्रेसर मॅकगर्क चार सामन्यांमधून दोन अर्धशतकांसह १६३ धावा फटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. डेव्हिड वॉर्नरचे या लढतीने पुनरागमन होऊ शकते. शाई होप याला मागील लढतीत संधी दिली होती. अक्षर पटेलला अधिक चेंडू खेळायला मिळायला हवे, असे जाणकारांचे मत आहे.

कुलदीप, अक्षरवर मदार

दिल्ली संघाची गोलंदाजी विभागाची मदार कुलदीप यादव (१२ विकेट) व अक्षर पटेल (७ विकेट) या दोन फिरकी गोलंदाजांवर आहे. दिल्लीची वेगवान गोलंदाजी कमकुवत ठरत आहे. ॲनरिक नॉर्किया या दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांच्या गोलंदाजीवर १३.३६ च्या सरासरीने धावा फटकावण्यात आल्या आहेत. खलील अहमद, मुकेशकुमार यांच्या गोलंदाजीवरही धावांची लूट करण्यात आली आहे. मुंबईच्या फलंदाजांना दबावात ठेवण्याचे काम दिल्लीच्या गोलंदाजांना करावे लागणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply