Crime News : हिऱ्यांच्या बदल्यात काचेचे तुकडे देत हिरे व्यापाऱ्याची फसवणूक; क्राईम ब्रांचकडून 2 आरोपी अटकेत

मुंबई : गुजरातमधील एका प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कांदिवली आणि लालबाग भागातून दोन संशयितांना रविवारी अटक केली आहे. आरोपींनी हिऱ्याच्या बदल्यात बनावट हिरा आणि काचेचे तुकडे विकून हिरे व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आरोपींनी या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये हिरे व्यापाऱ्याकडे हिरे विकत घेण्यासाठी संपर्क साधला होता.

घटनाक्रम

घटना 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान गुजरातमध्ये सुरतला घडली होती. आरोपीनी हिरे व्यापारी धर्मेश पवाशिया यांच्याशी फोनवर संभाषणा केल्यानंतर हिरे खरेदी करण्याच्या बहाण्याने ते गुजरातमध्ये व्यापाऱ्याच्या दुकानात गेले. त्यांनी व्यापाऱ्याला हिरे दाखवण्यास सांगितले. हिरे व्यापाऱ्यांनी चहासाठी दोघांना विचारले असता त्यावर सहमती दर्शवली.

चहाची ऑर्डर देत असताना हातचलाखी करत आरोपींनी खरे हिरे ताब्यात घेतले आणि काचेचे तुकडे असलेले बनावट हिरे ठेवले. त्यानंतर दोन्ही आरोपी तेथून निघून गेले. खरे 1कोटी 18 लाखाचे हिरे बदलून बनावट हिरे आल्याचे आणि या दोघांकडून आपली फसवणूक झाल्याचे हिरे व्यापाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने गुजरातमधील स्थानिक सुरत पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.

क्राईम ब्रांचची कारवाई

गुजरात पोलिसाना संशयित मुंबईला पळून गेला असल्याची माहिती मिळाली. गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. मुंबई क्राइम ब्रँचने गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तांत्रिक पुरावा आणि त्यांच्या गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून असे आढळले की संशयितांपैकी एक कांदिवली आणि दुसरा लालबागमध्ये वास्तव्यास आहे.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संशयितांना पकडण्यासाठी दोन पथके तयार केली. गुजरातमधील अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर अवघ्या सात तासांत दोघांनाही पकडण्यात अधिकाऱ्यांना यश आले. संशयितांना पकडल्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply