Commonwealth Games: भारतीय वेटलिफ्टिंगपटूंची सुवर्णपदकांची हॅटट्रीक; २० वर्षीय अचिंतने विक्रमी कामगिरीसहीत पटकावलं पदक

युवा वेटलिफ्टिंगपटू अचिंत शुलीने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत भारतासाठी तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. २० वर्षीय अंचितने ७३ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पश्चिम बंगालच्या या खेळाडूने १४३ किलो वजन उचललं. हा या स्पर्धेतील नवीन विक्रम ठरला आहे. शुलीची ही कामगिरी भारतासाठी एकाच दिवसात दुसरं सुवर्णपदकाची कमाई करणारी कामगिरी ठरली. शुलीच्या आधी युवा वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरिननुंगाने पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये १४० किलो आणि क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १६० किलो असे एकूण ३०० किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले.

शुलीने स्नॅच प्रकारामध्ये १४३ किलो वजन उचललं. हा या स्पर्धेतील विक्रम आहे. तर शुलीनेच क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १७० किलोसहीत एकूण ३१३ किलो वजन उचलत या स्पर्धेमधील नवीन विक्रम आपल्या नावे करुन घेतला. मागील वर्षी जागतिक स्तरावरील ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये शुलीने रौप्य पदकाची कमाई केली होती. शुलीने आपल्या तिसऱ्या संधीमध्ये राष्ट्रकुलमध्ये पदक मिळवून देणारे दोन्ही लिफ्ट केले. मलेशियाच्या ई हिदायत मोहम्मदला या स्पर्धेत रौप्य तर कॅनडाच्या शाद डारसिग्रीला कांस्य पदक मिळालं. मलेशियाच्या खेळाडून ३०३ किलो तर कॅनडाच्या खेळाडूने २९८ किलो वजन उचललं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन अंचितचं अभिनंदन केलं आहे. “अचिंतने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. तो त्याचा शांत स्वभाव आणि दृढत निश्चयासाठी ओळखला जातो. या विशेष उपलब्धतेसाठी त्याने फार मेहनत घेतली आहे. पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून त्याला शुभेच्छा,” असं मोदींनी म्हटलंय.

शुलीच्या आधी २०१८च्या युवा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या जेरेमीने भारताला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं. एकूण ३०० किलो वजन उचलत सुवर्णपदकावर जेरेमीने आपलं नाव कोरलं. सामोआचा वैपाव्हा नेव्हो इओआने याने २९३ किलो (१२७ किलो आणि १६६ किलो) वजनासह रौप्यपदक पटकावले. तर नायजेरियाचा एडिडिओंग जोसेफ उमोआफिआने २९० किलोसह (१३० किलो आणि १६० किलो) कांस्यपदक मिळवले. १९ वर्षीय जेरेमीने स्नॅच (१४० किलो) आणि एकूण वजन (३०० किलो) या विभागांमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वाधिक वजनाचा विक्रम रचला. क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये वजन उचलताना त्याला दोन वेळा त्रास झाला; पण त्यातून सावरत त्याने सोनेरी यश मिळवले. जेरेमीने स्नॅचमध्ये १४० किलो वजन उचलत सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी एडिडिओंगविरुद्ध आघाडी घेतली. यानंतर अखेरच्या प्रयत्नात त्याने १४३ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. २०२१च्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या जेरेमीने क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १५४ किलो वजनासह सुरुवात केली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने १६० किलो वजन उचलले. मग १६५ किलोचा त्याचा तिसरा प्रयत्न सदोष होता.

जेरेमी लालरिननुंगा (सुवर्ण), मीराबाई चानू (सुवर्ण), संकेत सरगर (रौप्यपदक), बिंद्याराणी देवी (रौप्यपदक) आणि गुरुराजा पुजारी (कांस्यपदक) यानंतर भारताचे वेटलिफ्टिंगमधील हे सहावे पदक आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply