Chinchwad Bypoll Election : चिंचवडमध्ये ४३ लाख, कसब्यात पाच लाख जप्त

पुणे : चिंचवडमध्ये ४३ लाखांची, तर कसब्यामध्ये पाच लाखांची रोकड भरारी पथकाकडून जप्त करण्यात आली आहे. निवडणुकीस सहा दिवस राहिले असताना निवडणूक आयोग सतर्क झाले असून, नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.

कसबा पेठ व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आर्थिक उलाढाल रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पोटनिवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देशपांडे यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, ‘‘निवडणुकीदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांची तसेच आचारसंहिता उल्लंघनाची माहिती नागरिक सी-व्हिजिल ॲपद्वारे देऊ शकतात. फोटो काढून अथवा मेसेजच्या माध्यमातूनसुद्धा तक्रार नोंदविता येते. या तक्रारीची दखल अवघ्या काही मिनिटांमध्ये घेतली जाईल.’’

यंदाच्या निवडणुकीमध्ये ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना पोस्टल मतदानाची सुविधा प्रथमच उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदारांच्या घरी जाऊन अर्ज भरून घेण्याचे आदेश दिले होते.

 

त्यानुसार कसबा विधानसभा मतदारसंघात अधिकाऱ्यांनी राबविलेल्या मोहिमेत पाच हजार ४५० नागरिक हे मतदान केंद्रात येऊन मतदान करणार असल्याचे सांगितले, तर ३०६ मतदारांनी पोस्टल मतदानासाठी १२ डी हा अर्ज भरून दिला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिली.

निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये

  • कसबा मतदारसंघात एकूण मतदार २,७५,६७९

  • कसब्यात एकूण मतदान केंद्र ः २७०

  • संवेदनशील मतदान केंद्र ः ९

  • वेबकास्टिंग करणाऱ्या मतदानाची संख्या ः २७

  • आवश्‍यक मनुष्यबळ (अधिकारी-कर्मचारी) ः १३००

  • केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या ः ५

  • पोलिस कर्मचारी ः १५००

कसबा व चिंचवड मतदारसंघातील मतदारांना फोटो व्होटर स्लीपचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. कसब्यातील सुमारे ३१ हजार मतदारांना, तर चिंचवडमधील ६४ हजार मतदारांना फोटो व्होटर स्लीपचे वाटप केले आहे. येत्या चार दिवसांत फोटो व्होटर स्लीपचे १०० टक्के वाटप होईल.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply