संभाजीनगरात रात्री दोन गटात राडा, पोलिसांच्या गाड्यांसह खासगी वाहनांची जाळपोळ, किराडपुरात दगडफेक

छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री दोनच्या दरम्यान दोन गटात झालेल्या दंगलीत अनेक गाड्यांची जाळपोळ झाली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला. यामध्ये एक जण जखमी झाल्या असल्याचे वृत्त आहे. जमावाने रात्री पोलिसांच्या गाड्याही जाळल्या आहेत. शहरातील किराडपुरा भागात ही दंगल झाली. राम मंदिराजवळ तरुणांमध्ये आधी बाचाबाची झाली त्यानंतर दगडफेक करण्यात आली. पुढे जाळपोळ आणि हाणामारी सुरूच होती. अफवांवर विश्वास ठेवू नका असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी किराडपुरात भागात मोठा बंदोबस्त केला आहे. नागरिकांना शांतता राखण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच संभाजीनगरातील सर्वपक्षीय नेत्यांनी देखील नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. संपूर्ण परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, “रात्री जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि आता परिस्थिती शांत आहे. संबंधित गुन्हेगारांवर पोलीस कडक कारवाई करतील”, असं छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितलं.

पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले की, संभाजीनगरमध्ये लोक एकोप्याने राहतात, अशीच शांतता ठेवण्यात आणि चांगलं वातावरण ठेवण्यात नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं. कालच्या घटनेप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जे लोक यात सहभागी होते त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

इम्तियाज जलील यांचं नागरिकांना आवाहन

ज्या राम मंदिराबाहेर हा राडा झाला त्या मंदिरात सभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील गेले. तिथून त्यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, मी सध्या राम मंदिरात आहे. या मंदिरात कोणतीही गडबड झालेली नाही. मात्र मंदिराबाहेर थोडा गोंधळ आहे. जर कोणी चुकीच्या अफवा पसरवत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका. मंदिराबाहेर काही वाहनांचं नुकसान केलं आहे. परंतु मंदिरात कोणतंही चुकीचं काम करण्यात आलेलं नाही. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply