Chhatrapati Sambhaji Nagar : काम बंद आंदोलन नडलं! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील 90 कंत्राटी कर्मचारी बडतर्फ; मनपा प्रशासकांची मोठी कारवाई

Chhatrapati Sambhaji Nagar : दिवाळीच्या  पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचारी यांना काम बंद आंदोलन महागात पडले आहे. कारण, महापालिकेच्या पाणीपुरवठा, अग्निशमन या अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या विभागासह यांत्रिकी, पशुसंवर्धन विभागातील एकूण 90 कंत्राटी कर्मचारी यांना थेट कामावरून बडतर्फ करण्याचा निर्णय मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. नागरिकांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आणि परवानगी न घेताच गैरहजर राहिले, यामुळे मनपाच्या अत्यावश्यक सेवेवर परिणाम झाला असून शहरवासीयांना अनंत अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले असल्याची माहिती जी. श्रीकांत यांनी दिली आहे. 

एकीकडे दिवाळी सण असतांना अचानक महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे याचे परिणाम अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या विभागावर जाणवत आहे. दरम्यान, याची गंभीर दखल मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी घेतली असून, थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमधील 90 कंत्राटी कर्मचारी यांना बडतर्फ करत त्यांना घरी पाठवण्याचे आदेश मनपा प्रशासक यांनी दिले आहे. त्यामुळे महानगरपालिकेत एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हि पहिल्या टप्प्यातील कारवाई असून, यापुढे देखील अशीच कारवाई होण्याची शक्यता आहे. 

Maratha Reservation , Obc Reservation : मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर थेट अमित शाह लक्ष घालण्याची शक्यता, लवकरच राज्यांतील महायुतीच्या नेत्यांची घेणार बैठक

कोणत्या विभागातील किती कर्मचाऱ्यांवर कारवाई...

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकूण 4 हजार पेक्षा अधिक कर्मचारी असून, यातील 2500 कंत्राटी कर्मचारी आहे. दरम्यान, अशात 123 कायमस्वरूपी कर्मचारी पहिल्या आणि 285 कर्मचारी दुसऱ्या टप्प्यात भरले जाणार आहे. त्यामुळे 500 कर्मचारी कमी करण्याचा निर्णय मनपा घेणार होते. असे असतानाच कंत्राटी कर्मचारी यांच्याकडून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे मनपा प्रशासक यांनी थेट कारवाई सुरु केली आहे. ज्यात, 90 कंत्राटी कर्मचारी पहिल्या टप्प्यात कमी करण्यात आले आहे. ज्यामध्ये पाणीपुरवठा विभाग 43, अग्निशमन विभाग 27, यांत्रिकी 9 व पशुसंवर्धन विभागातील 11 अशा एकूण 90 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी आदेश दिले आहे. 

यामुळे करण्यात आली कारवाई...

प्रत्येक महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या मनपाच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्याची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे मनपाच्या सर्वच विभागात कर्मचाऱ्यांची कमी भासत आहे. हे मनुष्यबळ उपलब्ध करण्याकरिता मनपाने कंत्राटदारामार्फत कंत्राटी कर्मचारी भरती केली आहे. मनपाच्या वेगवेगळ्या विभागात हे कंत्राटी कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन दिले जात आहे. असे असून सुद्धा नागरिकांना मुलभूत व अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविण्याच्या कामात हे कर्मचारी निष्काळजीपणा करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचं प्रशासक जी. श्रीकांत यांनी म्हटले आहे. 

'एस्मा'ही लावणार

महानगरपालिकेतील एकाच वेळी 90 कर्मचारी काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तर, महापालिकेतील कायमस्वरूपी किवा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून शहरातील जनतेला वेठीस धरले जात असेल तर, त्यांना कामावरून काढून टाकणारच, शिवाय त्यांना एस्मा कायदा लावणार असल्याचे देखील प्रशासक जी श्रीकांत यांनी म्हटले आहे. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply