Bharat Bandh : आज देशव्यापी ‘भारत बंद’! कामगार संघटनांचा एल्गार; नेमक्या मागण्या काय? कोण सहभागी? काय बंद–काय सुरू? सविस्तर जाणून घ्या

Mumbai :  केंद्र सरकारच्या कामगार व शेतकऱ्यांबाबतच्या धोरणांविरोधात आज, १२ फेब्रुवारी देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईत वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर दुपारी तीन वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने हा निर्णय जाहीर केला.

महाराष्ट्रात कामगार, कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली इंटक, आयटक, एचएमएस, सीटीयू, एनटीयूआय, भारतीय कामगार सेना, एआयसीसीटीयू, एआयबीईए, बीईएफआय, एआयआयईए, राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, श्रमिक एकता मंच, कामगार एकता, स्वतंत्र फेडरेशन आदी २०हून अधिक संघटना एकवटल्या आहेत.

‘कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार कठोर, निगरगट्ट मनाचे झाले आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला आता दिल्ली दरबारी संसदेत खासदारांद्वारे जागे करावे लागेल. मुंबईसह देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील एनटीसीच्या २३पेक्षा अधिक गिरण्या गेली पाच वर्षे बंद आहेत. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपासमारीला अंत उरलेला नाही. २९ जुने सक्षम कामगार कायदे रद्द करून, चार कामगार संहिता केंद्र सरकारने लागू केल्या आहेत. त्यामुळे कामगारवर्ग अडचणीत आला आहे,’ असे ते म्हणाले.

‘कामगार संघटनांनी शंभर वर्षांच्या लढ्यातून मिळविलेले कामगार हिताचे २९ कायदे विद्यमान केंद्र सरकारने रद्द करून चार कामगार संहिता लागू केल्या आणि कामगार वर्गाचे भविष्यच अंधारात आणले,’ असा आरोप महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केला.

हे कामगार सहभागी होणार
बँका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, परिचारिका, फेरीवाले, घरेलू कामगार, कंत्राटी कामगार, बस, रिक्षा, टॅक्सी, असंघटित कामगार आदी विविध क्षेत्रांतील कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे संयुक्त कृती समितीने म्हटले आहे. आंदोलन शांततेत पार पाडण्यात येणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.

काय बंद?
सार्वजनिक वाहतूक, बॅंकिंग, विमा सेवा, सरकारी कार्यालय, बाजारपेठा, दुकानं, शाळा-महाविद्यालयं

काय सुरु?
रुग्णालय, औषधांची दुकानं, रुग्णवाहिका आरोग्यसेवा, दूध भाजीपाला पुरवठा, अग्निशमन आपत्कालीन सेवा, वीज पाणीपुरवठा

महाराष्ट्र काँग्रेसचा पाठिंबा
भारत बंदला महाराष्ट्र काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. 'कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगारांच्या हिताला बाधा पोहोचली आहे. या बदलांमुळे कामगारांच्या रोजगारसंधी कमी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या विविध संघटनाही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. केंद्राचे धोरण शेतकरी आणि कामगारविरोधी असल्याने त्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत,' अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *