Beed : '... नाहीतर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता', अपहरणाआधी नेमकं काय घडलं? कार चालकाने सांगितला घटनाक्रम

 

Beed : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडी आणि एसआयटी ने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणातील विविध व्यक्तींचे जबाब समोर येत असतानाच, संतोष देशमुख यांचे अपहरण नेमके कसे झाले? याबाबतच्या प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाने मोठा खुलासा केला आहे. चालकाच्या गळ्यावर कोयता ठेवून आरोपींनी संतोष देशमुखांचे अपहरण केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

कोयत्याचा धाक आणि अपहरण

प्रत्यक्षदर्शीने जबाबात देशमुख यांचे अपहरण होण्याआधी नेमकं काय घडलं? याचा घटनाक्रम सांगितला आहे. ९ डिसेंबरला संतोष देशमुख आपल्या चारचाकीवरून केजकडून मस्साजोगला जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत एक चालकही होता. अचानक एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. आरोपींनी संतोष देशमुख यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या गळ्यावर कोयता ठेवला आणि देशमुखांचे अपहरण केले, असं प्रत्यक्षदर्शीने आपल्या जबाबात म्हटलं आहे.

 

 

पोलिसांनी हालचाल केली नाही

घटना घडल्यानंतर प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याकडे धाव घेतली. प्रत्यक्षदर्शी व्यक्ती आणि धनंजय देशमुख यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना या घटनेची माहितीही दिली. मात्र, पोलिसांनी या दोघांना तब्बल साडेतीन तास पोलीस ठाणे बाहेर बसवून ठेवलं होतं. पोलिसांनी त्यावेळी अनेक कारणेही दिली असल्याचं प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितलं आहे.

त्यावेळी पोलीस ठाण्यात पीआय महाजन आणि बनसोडे नावाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांना संतोष देशमुख यांचे अपहरण केले असल्याची माहिती दिली. मात्र, त्यांनी घटनेची गांभीर्य लक्षात न घेता कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल लोकेशन शोधलं नाही. त्यावेळी अपहरण करणारी व्यक्ती आणि स्कॉर्पिओ वाहनाचा शोध पोलिसांनी घेतला नाही, जर पोलिसांनी कारवाई केली असती तर, संतोष देशमुख यांचे प्राण वाचले असते. या घटनेमध्ये पोलीसही दोषी आहेत. पोलिसांना सहआरोपी करावे, अशी मागणी प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने केली आहे.

प्रत्यदर्शीने ज्यांची नावे घेतली, त्या आरोपींवर आधीच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत. हे पलिसांना माहित असूनही त्यांनी शोध घेतलेला नाही. पोलिसांच्या गाडीवर प्रत्येकाकडे जीपीआरएस सिस्टीम असते. पोलिसांनी याआधारे संतोष देशमुख यांचा शोध घेतला असता. कदाचित पुढील घटना घडली नसती, असंही प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply