Barsu Refinery Project : बारसूची जमीन उद्धव ठाकरेंनीच सुचवली, मोदींना 2020 मध्ये पाठवले होते पत्र : उदय सामंत

Mumbai News: बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणावरुन सुरु असलेल्या वादावर राज्याजे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 'बारसूची जमीन उद्धव ठाकरेंनीच सुचवली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात 2020 मध्ये पत्र पाठवले होते.', असा दावा त्यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांना उद्धव ठाकरेंचे ते पत्र देखील दाखवले.

उदय सामंतांनी पत्रकार परिषद घेत बारसू प्रकल्पासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या पत्राचा दाखला दिला. यावेळी त्यांनी असे सांगितले की, 'रिफायनरीसाठी बारसूची जमीन उद्धव ठाकरे यांनीच सुचवली होती. या संदर्भात त्यांनी 12 जानेवारी 2020 ला पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. बारसूमध्ये 1300  एकर जमीन रिफायनरीसाठी देऊ शकतो असे त्यांनी पत्रात लिहिले होते.' बारसूवरुन राजकारण करणाऱ्यांना या पत्राचा दाखला देत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाला विरोध आहे. एकनाथ शिंदेंऐवजी तेच मुख्यमंत्री असते तर प्रकल्प पुढे गेला असता.', असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. 'शिवसेना भवनावर एक पत्रकार परिषद झाली होती. त्यात रिफायनरी आम्ही आणली त्याचे श्रेय सरकारने घेऊ नये असे म्हटले होते. आता यात राजकारण का?', असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.

उदय सामंत यांनी पुढे सांगितले की, 'रिफायनरीच्या कामामध्ये राजकारण केले जात आहे. पण हे राजकारण करण्याची गरज नाही. समृद्धी महामार्गाच्या बाबतीत देखील तेच होत होते. मतांचं घाणेरडं राजकारण करु नका. एकीकडे प्रकल्पाला विरोध करायचा दुसरीकडे प्रकल्प बाहेर गेले म्हणून खापर आमच्यावर फोडायचे. हे सगळं नौटंकी आहे.', असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply