Mumbai : वांद्रे-वर्सोवा सी लिंक ''स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू' म्हणून ओळखला जाणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Mumbai : मुंबईतल्या वांद्रे-वर्सोवा सी लिंकबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे नाव बदलण्यात आले आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंक आता 'स्वातंत्रवीर सावरकर सागरी सेतू' म्हणून ओळखला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे नाव बदलले जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. अखेर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली. या सी लिंकला 'स्वातंत्रवीर सावरकर सागरी सेतू' असे नाव देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'सावरकर जयंतीनिमित्त आम्ही राज्यभर गौरव दिन साजरा केला. त्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सावरकर आणि सागर यांचे एक वेगळे नातं आहे. त्यामुळे आम्ही वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूला 'स्वातंत्रवीर सावरकर सागरी सेतू' हे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत सांगितले की, 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केल्याबद्दल मी त्यांचा नितांत आभारी आहे. 16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी केली होती. आपल्या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण सदोदित नव्या पिढीला होत राहील आणि त्यातून उद्याच्या समर्थ भारतासाठी गौरवशाली पिढ्यांचे निर्माण होईल.'

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी याबाबत ट्वीट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'छत्रपती संभाजी महाराजांचे नाव कोस्टल रोडला व त्याच कोस्टल रोडचा भाग असलेल्या वांद्रे वर्सोवा सी-लींकला सावरकरांचे नाव देणे कितपत योग्य? संभाजी महाराज नाकर्ते व रागीट होते व त्यांना मंदिरा मदिराक्षींबद्दल आसक्ती होती हे सावरकरांचे मत होते. दोन्ही नावे एकत्र हा विरोधाभास नव्हे का?', असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. तर वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव देण्यात यावे. तर मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे केली होती. त्याच्या या पत्रानंतर आता मुख्यमंत्र्यांनी नावाबाबतच्या निर्णयाची घोषणा केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply