Ashadi Wari 2023 : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान

देहू : पंढरीची वारी । आनंद सोहळा ।।

पुण्य उभे राहो आता ।

संताच्या या कारणे ।।

पंढरीच्या लागा वाटे ।

सखा भेटे विठ्ठल ।।

या भावनेने संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेले लाखो भाविक शनिवारी (ता. १०) सहभागी झाले. ‘तुकोबाऽ तुकोबाऽऽ’ आणि ‘ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ’ असे नामघोष आणि टाळ-मृदंगांच्या गजरात सर्व तल्लीन झाले होते.

आषाढी वारीनिमित्त सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने देहूतून पंढरपूरकडे शनिवारी दुपारी अडीच वाजता प्रस्थान ठेवले. हातात भगव्या पताका घेऊन नामघोष करणाऱ्या वारकऱ्यांमुळे आणि टाळ-मृदंगाच्या गजराने देहूनगरी दुमदुमली.

भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या वैष्णवांनी आनंदाने दिंड्यांमधून फेर धरला. संत तुकाराम महाराज मुख्य देऊळवाडा परिसरात ‘याची देही, याची डोळा’ सोहळा अनुभवला. पालखी प्रस्थान सोहळ्याचे पारंपरिक कार्यक्रम पहाटे साडेचारपासून सुरू झाले.

पाच वाजता देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात पालखी सोहळाप्रमुख भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी सपत्नीक महापूजा केली.

पालखी सोहळा जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. देऊळवाड्यातील भजनी मंडपात सकाळी दहा वाजता पुंडलिक महाराज मोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले.

‘तुझिये संगती झाली आमुची निशकिंती। नाही देखियेले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे।। या अभंगाचे निरूपण त्यांनी केले. सकाळी साडेदहा वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतील घोडेकर बंधू (सराफ) यांनी चकाकी देऊन इनामदारवाड्यात आणल्या. दिलीप महाराज गोसावी इनामदार यांच्या हस्ते पादुकांची पूजा झाली.

मानकरी म्हसलेकर दिंडीतील सेवेकऱ्यांनी पादुका डोक्यावर घेऊन संबळ, टाळ-मृदंग आणि तुतारीच्या स्वरात वाजतगाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या. दुपारी दोन वाजता प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. भजनी मंडपात संत तुकाराम महाराज पादुका आणि माउलींच्या पादुकांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक महापूजा केली.

खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, श्रीकांत भारती, सुनील शेळके सपत्नीक, माजी आमदार विलास लांडे यांनीही पूजा व आरती केली.

देहू गावातील ज्येष्ठ वारकरी विक्रमबुवा माळवे देहूकर यांना यंदा पूजेचा मान मिळाला. कोथरूड येथील ग्रामोपाध्याय सुहास टंकसाळे यांनी पौराहित्य केले. संस्थानचे अध्यक्ष, सोहळाप्रमुख व विश्वस्तांसह नगराध्यक्षा स्मिता चव्हाण उपस्थित होत्या.

वरुणराजाच्या शिडकाव्याने चैतन्य

शनिवारी सकाळी महाद्वारातून मानाच्या दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात आला. अकलूज येथील मोहिते-पाटील व बाभूळगावकर यांच्या अश्वांनी महाद्वारातून प्रवेश केला. पादुका पूजनानंतर फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख यांचा संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. देऊळवाड्यात मंदिर प्रदक्षिणेसाठी फुलांनी सजविलेल्या पालखीत पादुका ठेवण्यात आल्या. मंदिर प्रदक्षिणा सुरू झाली.

‘ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ’ नामघोष आणि विठुनामाचा गजर करीत वारकरी फुगड्या खेळले. देहभान विसरून वारकरी आनंदाने नाचत होते. प्रदक्षिणेसाठी मानाच्या दिंड्या सज्ज होत्या. मानाचे अश्व होते. खांद्यावर गरुडटक्के आणि हातात चोप घेतलेले चोपदार होते. वरुणराजाने हलकीशी हजेरी लावली आणि वारकरी आणखी आनंदी होऊन नाचू लागले. देऊळवाड्यातील प्रदक्षिणेनंतर सायंकाळी पालखी सोहळा इनामदारवाड्यात मुक्कामी पोचला. रविवारी (ता. ११) सकाळी अकराला पालखी सोहळा आकुर्डी येथील मुक्कामाकडे मार्गस्थ होईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply