Anil Deshmukh : अनिल देशमुखांचा अँटेलीया प्रकरणाच्या मास्टरमाईंडबाबत मोठा दावा;

पुणे : ""उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलीया बंगल्याबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणातील मास्टरमाईंड परमबीर सिंग हेच आहेत. त्यांचा विरोधकांनी वापर करीत मला तुरुंगात धाडले. सिंग यांच्या निलंबनाबाबत केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाने (कॅट) राज्य सरकारला तीनदा अहवाल मागवूनही त्यांनी तो दिला नाही.

त्यामुळे "कॅट'ने एकतर्फी निर्णय घेत सिंग यांच्या निलंबन रद्द करण्याचा आदेश दिला. हा आदेश म्हणजे राज्य सरकारने सिंग यांना दिलेली बक्षिसीच आहे,'' असा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

पोलिस अधिकारी परमबीर सिंग यांच्या 100 कोटी रुपयांच्या आरोपामुळे 14 महिने कारागृहात राहिल्यानंतर देशमुख यांची काही महिन्यांपुर्वी न्यायालयाने पुराव्याअभावी जामीनावर मुक्तता केली होती. त्यानंतर पुण्यात पहिल्यांदाच आलेल्या देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले, ""अँटेलीया स्फोटक प्रकरणावेळी परमबीर सिंग आयुक्त होते. त्या सर्व प्रकरणात तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेरील कोणीही नव्हते.

जिलेटीन ठेवण्याचा प्रकार चार जणांनी केला. त्या प्रकरणात पोलिस आयुक्त कार्यालयातील इनोव्हा गाडी वापरण्यात आली. जिलेटीन ठेवणारा पोलिस अधिकारी सचिन वाजे यालाच त्या प्रकरणाचा तपास अधिकारी केला. दरम्यान, अँटेलीया व मनसुख हिरेनच्या मृत्यु प्रकरणाची दखल घेऊन आम्ही परमबीर सिंग यांची खालच्या पदावर बदली केली. त्या रागातुन व काही राजकीय व्यक्तींच्या सांगण्यावरुन परमबीर सिंगने माझ्यावर खोटे आरोप करुन अडकविण्याचा प्रयत्न केला.''

न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत देशमुख म्हणाले, ""माझ्यावर केलेले 100 कोटी रुपयांचे आरोप हे केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर होते, त्याबाबतचे कुठलेही पुरावे परमबीर सिंग यांनी न्यायालयात दाखल केले नाहीत. न्यायमुर्ती चांदीवाल यांनी सहा वेळा त्यांना समन्स पाठवूनही ते हजर राहिले नाहीत. पकट वॉरंट जारी झाल्यावर ते फरार झाले.

शेवटी त्यांनीच न्यायालयात आपल्याविरुद्ध पुरावे नसल्याचे हमीपत्र दिले. पुरावेच नसल्याने न्यायालयाने माझी सुटका केली. मात्र दुसरीकडे परमबीर सिंगचे निलंबनाबाबत "कॅट'ने राज्य सरकारकडे सिंग यांच्या त्यांचे निलंबनाबाबत वारंवार अहवाल मागितला. मात्र राज्य सरकारने तो अहवाल दिला नाही. त्यानंतर "कॅट'ने एकतर्फी निर्णय घेत त्याचे निलंबन रद्द करण्याचे आदेश दिले. हे एकप्रकारे सिंग याला बक्षिसी देण्याचाच प्रकार आहे.''

परमबीर सिंग विरुद्ध गंभीर गुन्हे

परमबीर सिंग विरुद्ध राज्यात विविध ठिकाणी खंडणी, कायद्याचा दुरुपयोग असे 8 ते 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अँटेलीया प्रकरणाचा तपास करणाऱ्या "एनआयए'ने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातही परमबीर सिंग यांचा मुख्य सहभाग असल्याचे नमूद केले आहे. त्याच पद्धतीने अँटेलीया प्रकरणात मुख्य सहभाग असूनही सिंग यांच्यावर कारवाई न करता त्यांना संरक्षण दिल्याबाबत न्यायालयाने ताशेरे ओढले असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

'परमबीर सिंगमागे" अदृश्‍य शक्ती'चा हात

परमबीर सिंगच्या खोट्या आरोपांवरुन 14 महिने तुरुंगवासात राहावे लागले. सिंग यांच्या मागे एका अदृश्‍य राजकिय शक्तीचा हात असून त्यांचा वापर मला अडकविण्यासाठी केला.कॅटला राज्य सरकारने अहवाल न देणे आणि कॅटने एकतर्फी दिलेल्या आदेशाचा वापर करीत राज्य सरकारने परमवीर सिंगचे निलंबन रद्द करणे म्हणजे माझ्यावर खोटे आरोप केल्याबद्दल राज्य शासनाकडून परमवीर सिंगला दिलेले बक्षीस आहे, असेही देशमुख यांनी नमूद केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply