Andheri election 2022 : चिन्ह कोणतेही असो, जनता आमच्याबरोबर!; उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबई : ‘मशाल भडकली, भगवा फडकला. चिन्ह कोणतेही असो, जनता आमच्याच बरोबर आह’, हे आजच्या निकालाने स्पष्ट केले, असे परखड मतप्रदर्शन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे केले. विरोधकांना पराभवाचा अंदाज आल्यानेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा टोलाही ठाकरे यांनी लगावला. तर आम्ही निवडणूक लढविली असती, तर आमचाच विजय झाला असता. आमच्या मदतीमुळेच ऋतुजा लटके यांना विजय मिळाला, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी स्पष्ट केले.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर लटके यांनी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अनिल परब यांच्यासह ठाकरे यांच्या ‘ मातोश्री ’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विजयाबद्दल आनंद व्यक्त करून ठाकरे म्हणाले, लढाईची सुरुवातच विजयाने झाली आहे. ही लढाई वेगळी असल्याने शिवसेना कार्यकर्ते जोशात होते. पण आमचे पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठविण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि त्यांचे कर्ते करविते निवडणूक रिंगणात आलेच नाहीत. विरोधकांनी पराभव होईल, हे लक्षात आल्याने निवडणूकच लढविली नाही. लढत न झाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी पडले.

विरोधकांनी निवडणूक लढविली असती, तरी निकालावर काहीही परिणाम झाला नसता. नोटा पर्यायाला जी मते पडली आहेत, तीच मते विरोधकांना पडली असती, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला. ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार टीका केली. जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला गेले आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आले. गुजरातची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्र प्रेम उफाळून आले आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काही हवेतील प्रकल्प देण्याची घोषणा केली, असा टोला ठाकरे यांनी लगावला.  

भाजपचाच विजय झाला असता – शेलार

ऋतुजा लटके यांचा ५३ हजार ४७१ मतांनी विजय झाला. ऋतुजा लटके निवडून याव्यात, यासाठी भाजपने मदत केली व त्यांचा विजय सुकर झाला, असे सांगून मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी लटके यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. मात्र लटके यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप व अन्य पक्षांनी पाठिंबा देऊनही फारसे मतदान झाले नाही. भाजपने निवडणूक लढविली असती, तर लटके यांचा पराभव निश्चित होता, असे शेलार यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा पाठिंबा लक्षात घेता लटके यांना किमान ९० हजाराहून अधिक मते मिळायला हवी होती. पण जनतेने त्यांच्याकडे पाठ फिरविली, असे मत शेलार यांनी व्यक्त केले.

रमेश लटके यांच्या कामांमुळे विजय – ऋतुजा लटके

रमेश लटके यांच्या कामांच्या पुण्याईचा हा विजय असल्याचे ऋतुजा लटके यांनी सांगितले. पोटनिवडणुकीत नेहमीच कमी मतदान होते. भाजपला जर आमच्याबाबत सहानुभूती असती, तर त्यांनी अर्जच भरला नसता. नोटा पर्यायाला जे मतदान झाले आहे, ते भाजपचेच असल्याचे सांगून निवडणुकीचा कौल लक्षात आल्यानेच त्यांनी माघार घेतली, असे लटके यांनी स्पष्ट केले.

नोटासाठी भाजपकडून प्रचार – अनिल परब

भाजपने मुरजी पटेल यांना माघार घेण्यास सांगितली आणि पडद्याआडून नोटा पर्याय निवडण्याबाबत प्रचारही केला, असा आरोप शिवसेना नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी केला. पण तरीही लटके यांचा मोठय़ा मताधिक्याने विजय झाल्याने मुंबईकरांच्या मनात काय आहे आणि ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत, हे दिसून आल्याचे परब यांनी सांगितले. नोटाचा वापर ऐच्छिक असून त्याचा प्रचार करता येत नाही. पण पैसे देऊन प्रचार करण्यात  आला आणि पोलीस व निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचे परब यांनी नमूद केले. मशाल चिन्ह मिळाल्यानंतर आमचा पहिला विजय असून महाविकास आघाडी एकत्र आली तर काय करू शकते, हे निकालातून स्पष्ट होत असल्याचेही परब यांनी सांगितले. या निकालाबाबत आत्मचिंतनाची गरज असल्याचे मत उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी व्यक्त केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply