Ambedkar Jayanti 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 'BMC' सज्ज; चैत्यभूमी परिसरात सुशोभीकरण

Mumbai : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्ताने आज (दि. १४ एप्रिल २०२३) रोजी चैत्यभूमीवर अनुयायांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते. याअनुषंगाने मुंबई महानगरपालिकेने विविध नागरी सेवा - सुविधा पुरविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.

प्रामुख्याने चैत्यभूमी परिसरासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्‍थान असणाऱ्या 'राजगृह' याठिकाणी आणि इतर महत्वाच्या ठिकाणी विविध सेवा सुविधा देण्यात येणार आहेत. 

चैत्यभूमीसह विविध ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा - सुविधांबाबत वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच अनुयायांसाठी सर्व तयारी प्रशासनाकडून करून देण्यात आली आहे.

यंदाच्या जयंती दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चैत्यभूमी परिसरात पाच एलईडी स्क्रिनद्वारे चैत्यभूमीच्या आतील अभिवादनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

त्यासोबतच आरोग्य सुविधा, क्लोज सर्कीट टिव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी आणि अग्निशमन व नियंत्रण कक्ष सेवा आदींचा या सुविधांमध्ये समावेश आहे. महानगरपालिकेचे परिमंडळ २ चे उपआयुक्त रमाकांत बिरादार आणि जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारीत लेजर शो आणि छायाचित्रांचे प्रदर्शन

यंदा पहिल्यांदाच अनुयायांसाठीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आयोजित एका विशेष लेजर शो चे आयोजन माता रमाबाई व्ह्युईंग डेक येथे दि. १३ एप्रिल व १४ एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात येणार आहे.

तसेच महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे एक हजार कर्मचारी कार्यतत्पर असणार आहेत.

चैत्यभूमी परिसरात सुशोभिकरणाची कामे :

चैत्यभूमी परिसरातील स्तूपासह सभोवतालच्या रेलिंगला रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्तूपाची सजावट ही विविध रंगांच्या फुलांनी करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून चैत्यभूमी परिसरातील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

तसेच चैत्यभूमी येथील तोरणा गेटची रंगरंगोटीही करण्यात आली आहे. चैत्यभूमी परिसरातील अशोक स्तंभाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणही करण्यात आले आहे. त्याचबरोबर याच ठिकाणी असणाऱ्या भीमज्योतीला सुंदर पद्धतीने फुलांची सजावट करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती व्हिवींग डेकलाही सजवण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply