Alibaug : बनावट सिगारेट कंपनीवर पोलिसांचा छापा, पाच कोटींचा मुद्देमाल जप्त

Alibaug : गोल्ड फ्लॅग कंपनीच्या नावाने बनावट सिगरेट बनवून वेगवेगळ्या राज्यात वितरण करणाऱ्या कंपनीवर रायगड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कंपनी चालवणाऱ्या १५ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

कर्जत येथील सागंवी गावात एका निर्जन ठिकाणी असलेल्या आलिशान फार्महाऊस मध्ये ही कंपनी बेकायदेशीरपणे थाटण्यात आली होती. पंधरा कर्मचारी तिथे काम करत होते. सिगरेट बनवण्यासाठी लागणारे साहीत्य आणि तीन मशिन्स या ठिकाणी बसवण्यात आल्या होत्या. गोल्ड फ्लॅग कंपनीच्या नावाने दररोज १५ लाख रुपयांची सिगरेट्स या ठिकाणी बनवल्या जात होत्या.

बॉक्स पॅकींगसाठी लागणारे साहित्य या ठिकाणी आढळून आले होते. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून शोध पथके कार्यन्वित करण्यात आली होती. स्थानिक शोध पथकांना या फार्म हाऊस परिसरात सुरु असलेल्या संशयास्पद हालचालीची खबर स्थानिक गुन्हे शाखेला लागली. त्यामुळे त्यांनी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या परवानगीने या फार्म हाऊसवर धाड टाकली. तेव्हा या बनावट सिगरेट कंपनीचा उलगडा झाला.

Maharashtra : रत्नागिरीत डंपरने दुचाकीला उडविले; दोघांचा जागीच मृत्यू

या कारवाईत पोलीसांनी एकूण २ कोटी ३१ लाख ६० हजार रुपयांची तयार सिगारेट, १५ लाख ८६ हजार रुपये किमतीचे सिगारेट बनविण्यासाठी लागणारे साहित्य, तर २ कोटी ४७ लाख रुपयाचे मशिन्स पोलीसांनी जप्त केल्या आहेत. कंपनीत काम करणाऱ्या १५ कामगारांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हे कामगार आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील आहेत. कंपनीचा सुरु करणार मुळ सुत्रधार दक्षिण भारतातील असल्याचे समोर आले असून त्याचा शोध सुरु आहे. ज्या फार्म हाऊस मध्ये ही कंपनी सुरु होती. त्या मुंबईतील फार्म हाऊस मालकाची शोध पोलीसांनी सुरू केला आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विवीध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply