Accident : माजी आरोग्यमंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात; मानेला व पाठीला दुखापत

भाईंदर - राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांच्या गाडीला काशी मिरा येथे डंपरने मागच्या बाजूने धडक दिल्याने ते जखमी झाले. सावंत यांच्या मणक्याला मार लागला असल्याची माहिती मिळाली आहे. मोखाडा येथे झालेल्या दोन कुपोषित मुलांच्या मृत्यू संदर्भात माहिती घेण्यासाठी सावंत मोखाडा येथे जात होते. दरम्यान डॉ. सावंत हे उपचारासाठी स्वतःहुन मुंबईतील अंधेरी येथील क्रीटी केअर रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोखाडा येथील सावरडे गावात दोन कुपोषित बालकांचा नुकताच मृत्यू झाला आहे. त्यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी व बालकांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत मोखाडा येथे जात होते. सकाळी साडे अकराच्या सुमारास काशी मिरा येथील सगणाई नाका येथे त्यांच्या गाडीला डंपर ने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली.

ही धडक एवढी जोरदार होती की सावंत यांच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली तसेच गाडीचे ही मोठे नुकसान झाले. वाहतूक पोलिस सावंत यांना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात नेत होते. मात्र सावंत यांनी आपण स्वतःच रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगून ते रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

सावंत हे मुंबईतील अंधेरी येथे असलेल्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असल्याचे काशी मिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यानी सांगितले. दरम्यान डंपर चालक इर्शाद खान याला पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *