पुणे : नवीन मुठा उजवा कालव्याला पुन्हा गळती ; गळती थांबवल्याचा जलसंपदा विभागाचा दावा

पुणे : खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान शहरातून वाहणाऱ्या नवीन मुठा उजवा कालव्यानजीक झालेली अतिक्रमणे, रस्ते, कालव्यात टाकण्यात येणारा कचरा, राडारोडा अशा विविध कारणांमुळे कालव्याला वानवडी येथे पुन्हा गळती लागल्याचे निदर्शनास आले आहे. ही गळती थांबवल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला आहे. मात्र, या निमित्ताने पुन्हा एकदा कालवा फुटल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

खडकवासला ते इंदापूपर्यंत २०२ किलोमीटर लांबीचा कालवा आहे. सन २०१८ मध्ये मुठा उजवा कालवा दांडेकर पूल परिसरात फुटला होता. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने शहरातून वाहणाऱ्या कालव्याची पाहणी केली होती. खडकवासला धरण ते हडपसर या २८ किलोमीटर मार्गात संरक्षक भिंतीला तडे गेल्याचे, भराव खचल्याचे, पाया कमकुवत झाल्याचे निदर्शनास आले होते. खडकवासला धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात येणाऱ्या ठिकाणीच धोकादायक स्थिती होती. तसेच धायरीत नांदेड सिटी आणि वडगाव बुद्रुक पुलाजवळ नादुरुस्त झालेल्या कालव्याच्या संरक्षक भिंतीची काही प्रमाणात दुरवस्था झाली होती. पर्वती पायथा येथे कालव्याच्या भिंतींना तडे गेले होते. याशिवाय स्वारगेट, डायस प्लॉट, पूलगेट, बी. टी. कवडे रस्ता, हडपसरमधील शिंदे वस्ती आणि पांढरे मळा, ससाणेनगर येथे कालव्यात गाळ साचलेला होता, अशी १४ धोकादायक ठिकाणे निदर्शनास आली होती.

या ठिकाणी आवश्यक कामे करण्यात आली आहेत. तसेच दर पावसाळय़ाच्या आधी मुठा उजवा कालव्याची कामे जलसंपदा विभागाकडून पूर्ण केली जातात. मात्र, कालव्यानजीक मोठय़ा संख्येने अतिक्रमणे झाली आहेत. तसेच अनधिकृत रस्ते आणि त्या रस्त्यांवरून होणारी अवैध वाहतूक यामुळे कालव्याचा मातीचा भराव खचत आहे. अतिक्रमणे मोठय़ा संख्येने असल्यामुळे जलसंपदा विभागाला कालव्याची कामे वारंवार करता येत नाहीत, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, खडकवासला धरणातून इंदापूपर्यंत नवीन उजवा मुठा कालव्यातून शहरासह ग्रामीण भागातील इंदापूर, दौंड, बारामती (काही भाग) आणि हवेली या तालुक्यांना शेती तसेच पिण्यासाठी पाणी देण्यात येते. गेल्या तीन महिन्यांपासून उन्हाळी आवर्तन सुरू आहे. सध्या कालव्यामधून एक हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपूर्वी उजवा मुठा कालव्यास वानवडी येथील जांभुळकर मळा परिसरातील धोबी घाटाच्या आसपास पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले. वेळीच ही बाब लक्षात आल्यामुळे ही गळती थांबविण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply