पुणे जिल्ह्यात 77 टक्के मान्सूनपूर्व पावसाची तूट; IMD ने काय माहिती दिली?

पुणे: राज्यात सर्व ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. परंतु पुणे जिल्ह्यात अपेक्षेएवढी मान्सूनपूर्व पावसाची नोंद झालेली नाही. पुणे जिल्ह्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, 1 मार्च ते 27 मे दरम्यान जिल्ह्यात 77 टक्के पावसाची कमतरता नोंदवली गेली आहे. पुण्यासाठी मान्सूनपूर्व पावसाची कमतरता 37.7 मिलिमीटर एवढी आहे. 

तर, IMD नुसार संपूर्ण महाराष्ट्रातही 62 टक्के कमतरता नोंदवली गेली आहे. IMD पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, पुणे शहरात ढगाळ वातावरण कायम राहील. परंतु शहरामध्ये पावसाची शक्यता कमी आहे.

अंदाजानुसार, मे अखेरपर्यंत पुणे शहरात ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. पण पावसाच्या सरी मात्र, कोसळणार नाहीत. तसेच पुण्याचे तापमान पुढील काही दिवसांत दिवसा 36 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान 26 अंश सेल्सिअस असेल, अशीही माहिती कश्यपी यांनी दिली. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची मोठी कमतरता असल्याने, हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले की, मान्सून जोरदार बॅटिंग करणार नाही. नैऋत्य मॉन्सून त्याच्या नियोजित तारखेपूर्वी अंदमानमध्ये पोहोचला असला तरी, त्यानंतर मान्सूनला विलंब झाला आहे.

IMD चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, या मोसमात मान्सून सुरुवातीला जोरदार नसेल. ते म्हणाले, नैऋत्य मान्सून येत्या दोन-तीन दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सून पोहोचल्यानंतर, तो महाराष्ट्र राज्यात कधी सक्रिय होईल याचा अंदाज लावला जात आहे.

मान्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज आयएमडीने यापूर्वी वर्तवला होता. तथापि, शुक्रवारी हवामान खात्याने नमूद केले की नैऋत्य मान्सून दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, मालदीव आणि लक्षद्वीपच्या लगतच्या भागात आणि आणखी काही भागात पुढे सरकला आहे.

हवामान विभागानुसार, केरळच्या किनारपट्टीवर आणि आग्नेय अरबी समुद्राला लागून असलेल्या भागात ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे केरळमध्ये येत्या 2-3 दिवसांत म्हणजे 30 मे पर्यंत मान्सून सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. याच काळात अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरात आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply