Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? भाजपा नेत्याचा दुजोरा, एकनाथ शिंदेंचं काय? म्हणाले, “भाजपाचा स्ट्राईक रेट..”

Devendra Fadnavis for Maharashtra CM Pravin Darekar Statement : मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं असल्याचा बातम्या अनेक वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. आज (२५ नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत दिल्लीत मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामार्फ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान, भाजपा नेते व फडणवीसांचे सहकारी आमदार प्रवीण दरेकर यांनी या वृत्तांना सूचक शब्दांत दुजोरा दिला आहे. दरेकर म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित होण्याचा आम्हाला निश्चितच अतिशय आनंद होत आहे. माझ्यासह तमाम भाजपा कार्यकर्त्यांना त्यामुळे आनंद होईल. महाराष्ट्रातील तमाम जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्यामागे आपलं बहुमत दिलं आहे”.

प्रवीण दरेकर म्हणाले, “राज्यातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांना बहुमत दिल्यानंतर आमच्या सर्व भाजपा कार्यकर्त्यांची व नेत्यांची मागणी होतीच की आता आपण जवळपास १३२ जागा जिंकल्या आहेत, आपल्याबरोबर चार ते पाच अपक्ष आमदार देखील देखील आहेत. त्यामुळे आपल्याबरोबर १३७ आमदार झाले आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येणं स्वाभाविक होतं. प्रसारमाध्यमं ज्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करत आहेत त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं असेल तर माझ्यासह भाजपा नेते कार्यकर्ते व महायुतीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना देखील आनंद होईल. कारण, देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही पक्षांना एकत्र घेऊन समन्वय साधत ही निवडणूक जिंकली आहे. ते मुख्यमंत्री झाले तर राज्यातील जनतेला आनंदच होणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी पाच वर्षे राज्याचे नेतृत्व केलं आहे. त्यांची प्रशासकीय व दूरदृष्टी असलेली कारकीर्द राज्यातील जनतेने पाहिली आहे”. दरेकर टीव्ही ९ मराठीशी फोनवरून बोलत होते.

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

महायुतीने ही विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. तसेच ज्याचे सर्वाधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल असं काही ठरलेलं नाही, असं महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जात होतं. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदेंचं काय होणार? असा प्रश्न प्रवीण दरेकर यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर दरेकर म्हणाले, “अशा काही जर-तर मध्ये महायुती पडत नाही. दोन्ही गोष्टींमध्ये भारतीय जनता पार्टी अव्वल आहे. आमचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे. आमच्या जागा देखील सर्वाधिक आहेत. त्यामुळे आम्ही महायुतीमधील पक्ष एकमेकांबरोबर स्पर्धा न करता तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधून मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय घेत आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील तर आमच्यापैकी कोणी नाराज होणार नाही किंवा ते मुख्यमंत्री झाले म्हणून इतरांकडे दुर्लक्ष होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची मोट बांधली आहे. तिन्ही पक्षांना एकत्र ठेवणं, जागावाटपाचं नियोजन करणं, प्रसंगी आपल्या जागा घटकपक्षांना सोडणं, घटकपक्षांकडे एखाद्या जागेवर उमेदवार नसेल तर उमेदवारासह ती जागा त्यांना देणं, असे महत्त्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये घेतले आहेत”.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply