Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. या बैठकीत शरद पवार यांनी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी स्थापन केलेली समितीने त्यांना पक्षप्रमुखपदाचा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रभर कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीने शरद पवार यांच्या राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव आज मांडला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांनी पुन्हा अध्यक्ष व्हावे, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. एक राजीनामा नामंजूर करण्याचा, तर शरद पवार पून्हा अध्यक्ष व्हावे, असा दुसरा प्रस्ताव मांडण्यात आला. निवड समितीने एकमताने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे.

आता शरद पवार काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार समितीची शिफारस मान्य करणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत. समितीची शिफारस शरद पवार यांना कळवण्यात येणार आहे.

शरद पवार काय म्हणाले होते -

पक्षाच्या भवितव्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी नवे नेतृत्व तयार करण्याचा संबंधित निर्णय घेतला होता परंतु माझ्या घोषणेनंतर माझ्या सर्व पक्षाच्या सहकाऱ्यांमध्ये तीव्र भावना आहे. तुमच्या भावनांचा आदर करून मी येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेईन. तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष होणार नाही याची मी काळजी घेईन, असे शरद पवार यांनी काल स्पष्ट केले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply