“१९९२ च्या मुंबई दंगलीत तुम्ही होता, म्हणून…” शिंदे गटाचं बाळासाहेब ठाकरेंना भावनिक पत्र

दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद सुरू आहे. आता ठाकरे गटाला शिवतीर्थ आणि शिंदे गटाला बीकेसी मैदान मिळालं आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, शिंदे गटाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भावनिक पत्र लिहिलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावर एका व्हिडीओच्या स्वरुपात हे पत्र शेअर केलं आहे.

संबंधित पत्रातून शिंदे गटानं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. शिवसेनेच्या वाघाला कुण्या शिकाऱ्यानं गुंगीचं इंजेक्शन दिलं, अशा शब्दांत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

संबंधित पत्रात शिंदे गटानं लिहिलं, “साहेब, तुम्ही गेलात आणि आपल्या शिवसनेच्या वाघाला कोण्या शिकाऱ्याने गुंगीचं इंजेक्शन दिलं. या गुंगीच्या इंजेक्शनचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला, शिवसेनेचा कणा हळूहळू मोडताना पाहून तुमच्या आत्म्याला किती वेदना होत असतील. हे आम्हाला सगळं दिसत होतं. पण उद्धवसाहेबांना आणि आदित्यला सांभाळू, या तुम्हाला दिलेल्या वचनामुळेच आम्ही शांत होतो. तुम्हाला ज्या विचारांची चीड होती, तेच विचार तत्व म्हणून आपल्या संघटनेत येऊ लागले. अनेकवेळा त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला. पण आमचा आवाज दाबला जाऊ लागला.

“रात्री जागून पोस्टर्स लावणाऱ्या, शिबीरं घेणाऱ्या, मराठी आणि हिंदू अस्मिता टिकवण्यासाठी झटताना, पोलीस गुन्हे आणि दांडेही अंगावर घेणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांच्या शब्दाला किंमतच उरली नाही. हौशा-गौशांच्या नावापुढे बिरुदं लागून संघटनेत त्यांचं वजन वाढू लागलं आणि आपली संघटना भरकटू लागली. तुमच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या जुन्या जाणत्या शिवसेना नेत्यांनाही राजकारणातून बेदखल केलं गेलं.”

पुढे पत्रात म्हटलं, “साहेब, तुम्ही होतात तेव्हा ‘मातोश्री म्हणजे आपुलकी’ हे समीकरणच होतं. तुम्ही कधीही खुर्चीचा मोह धरला नाही. पण तुम्ही गेलात आणि तुम्ही आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केलात, त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केवळ मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचं संधान जुळलं. तुमच्या अटकेचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली. साहेब असं करू नका हे आम्ही त्यावेळीही धाय मोकलून सांगत होतो. पण आमचं ऐकून घेणारा कानच उरला नव्हता. हेच आमचं दुर्दैव. तरीही आपले साहेब मुख्यमंत्री झाले याचं समाधान आणि आता सुराज्य साकार होईल अशी आशा होती.”

“पण विपरीतच झालं, १९९२ साली दंगलीमध्ये तुम्ही होतात, म्हणून मुंबई वाचली. पण त्रिपुरामधल्या तथाकथित घटनेवरून अमरावतीत दंगल उसळली, तरीही शिवसेना शांतच. संभाजीनगरचं कायदेशीर नामांतर व्हावं, ही तुमचीच इच्छा होती. पण आपलं सरकार असूनसुद्धा तुमची इच्छा पूर्ण होताना दिसेना. मुंबईच्या जीवावर उठलेल्या दाऊदचं मंत्र्यांशी असलेलं कनेक्शन सिद्ध झालं तरीही शिवसेना शांत होती” अशा शब्दांत शिंदे गटानं बाळासाहेब ठाकरेंना भावनिक पत्र लिहिलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply