सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला नवं वळण; आत्महत्या नव्हे हत्याच; कूपर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्याच्या दाव्याने खळबळ

 बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, तरी सुद्धा या प्रकरणात आरोप प्रत्यारोप होत आहे. आता मुंबईतील कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याने एक खळबळजनक दावा केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली नाही त्याची हत्या झाली होती, असा दावा कूपर रुग्णालयातील शवागृहातील कर्मचारी रुपकुमार शाह यांनी केला आहे. त्यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नाही तर हत्याच झाली, असा दावा रुपकुमार शाह यांनी केला आहे. सुशांतचा मृतदेह आला त्यावेळी मृतदेहावर जखमा होत्या. शरीराला मुका मार लागलेला होता. मृतदेहावर शवच्छेदन होत असताना मी पूर्ण वेळ तिथे होतो. डॉक्टरांना मी सांगितलं, की ही सुसाईड केस नाहीये मर्डर केस आहे. मात्र, त्यांनी लक्ष दिलं नाही, असा दावाही शाह यांनी केलाय.

रुपकुमार शाह हे मुंबईतील कूपर रुग्णालयातील शवागृहात 13 ते 14 जून 2020 ला कर्तव्यास होते. दीड महिन्यापूर्वी ते निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांना हा दावा केला आहे. नोकरीत असताना, त्रास होऊ नये म्हणून मी गप्प होतो, असंही शाह यांनी म्हटलं आहे. याबाबत साम टीव्हीने कूपर रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. मात्र, याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने सबंध चित्रपटसृष्टीला आणि चाहतावर्गला मोठा धक्का बसला होता. 2020 मध्ये मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला होता.मात्र, सुशांत सिंह राजपूतचे कुटुंब सातत्याने सुशांतच्या आत्महत्येला हत्या सांगत होते. मात्र या प्रकरणाचं गूढ कायम राहिले. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. सुरूवातीला मुंबई पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण समजून तपास केला होता. तर सुशांतच्या कुटुंबाने काही दिवसांनंतर हत्या असल्याचे सांगत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला हत्येसाठी जबाबदार ठरविले होते आणि तपासाची मागणी केली होती.

दरम्यान, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. त्यात सुशांत सिंह राजपूत प्रकरणं लोकसभेत उचलण्यात आले. त्यात AU नावाचा उल्लेख करण्यात आला. तर नागपूर हिवाळी अधिवेशनात दिशा सालियान प्रकरण पुन्हा उचलून धरत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. दिशा मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply