सुवर्णपाळण्यात मंगल स्वरांच्या नादघोषात दगडूशेठ मंदिरात गणेशजन्म सोहळा; भाविकांची अलोट गर्दी

श्रीगणेशा पाळणा हलके हलके जोजवा… पाळण्याचा मधोमध याला ग निजवा… अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशातील महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला डॉ. कृतार्थ क्षीरसागर, डॉ. रिद्धी क्षीरसागर, केदार गोडसे, प्राजक्ता गोडसे यांच्या हस्ते गणेशजन्माचे पूजन झाले. मंदिरावर केलेली तिरंगी फुलांची आरास व विद्युतरोषणाई अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला. शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुख-समृध्दी नांदू दे अशी प्रार्थना सर्वांनी श्रीं चरणी केली.

यावेळी शारदा गोडसे, मृणालिनी रासने, ज्योती सूर्यवंशी, तृप्ती चव्हाण, संगीता रासने, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्चना भालेराव, डॉ. अनघा राजवाडे, प्रेरणा देशपांडे, चित्रा जोशी, रत्ना नामजोशी, मानसी गिजरे यांसह इतर महिलांनी जन्माचा पाळणा, गणेश गीत व गणपतीचा गजर केला. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.

भक्तांनी दिलेल्या देणगीतून सुवर्णपाळणा साकारण्यात आला. सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर ग, मधोमध विसावला, माझा गणराज ग…असे म्हणत यंदाचा जन्मोत्सव सुवर्णपाळण्यात झाला. पाळण्याकरिता पाच फूट उंचीचा सागवानी लाकडाचा स्टॅड तयार करण्यात आला असून त्यावर ८.५ किलो चांदी वापरण्यात आली. तसेच त्यावर सोनाचे पॉलिश देखील करण्यात आले आहे. या स्टँडवर १६ बाय २४ इंचाचा सोन्याचा पाळणा साकारण्यात आला असून त्याकरिता २ किलो २८० ग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply