सीएसकेचा कॅप्टन झाल्यानंतर रविंद्र जडेजा काय म्हणाला?

चेन्नई सुपर किंग्जचे 12 हंगाम नेतृत्व करून चार वेळा आयपीएल विजेता आणि पाच वेळा उपविजेता बणवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने आज ( दि.24) आपले कर्णधारपद सोडले. चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंह धोनीने आपले कर्णधारपद रविंद्र जडेजाकडे सोपवल्याची घोषणा केली. याचबरोबर सीएसकेने धोनी यंदाच्या हंगामात आणि पुढच्याही हंगामात देखील सीएसकेचे प्रतिनिधित्व करेल असे जाहीर केले. दरम्यान, धोनीचा उत्तराधिकारी घोषित झालेल्या रविंद्र जडेजाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

जडेजा आपल्या प्रतिक्रियेत म्हणतो की, 'मला मोठी जबाबदारी मिळाली आहे. धोनीने सीएसकेसाठी जे केले त्याची बरोबरी होऊ शकत नाही. मला घाबरण्याची गरज नाही. एमएस धोनी अजूनही संघासोबत आहे. मी प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्याकडे जाईन. माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे माही भाईकडे मिळतील. तो माझ्या सोबत आहे त्यामुळे मला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तो सीएसकेसाठी एक मोठा वारसा सोडून गेला आहे.'

एमएस धोनी 2008 पासूनच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार होता. ज्यावेळी मधले दोन वर्षे चेन्नई सुपर किंग्जवर बंदी आली होती. त्यावेळी फक्त त्याच्या कॅप्टन्सीमध्ये खंड पडला होता. स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे सीएसकेवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

रविंद्र जडेजाला सीएसकेची कॅप्टन्सी मिळाल्यानंतर त्याचा आधीचा संघ सहकारी सुरेश रैनाने देखील प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'माझ्या भावासाठी मी खूप उत्साही आहे. आम्ही दोघे ज्या फ्रेंचायजीमध्ये मोठे झालो त्या फ्रेंचायजीचे नेतृत्व आता तो करणार आहे. सीएसकेसाठी यापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. जडेजा तुला शुभेच्छा. हा एक रोमांचित करणारा टप्पा आहे. मला आशा आहे की तू सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करशील.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply