संजय राऊतांच्या टीकेनंतर शिंदे गट आक्रमक, दीपक केसरकरांनी दिलं जशास तसं उत्तर,

शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्यामुळे राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. या बंडखोरीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर खालच्या भाषेत टीका केली असून आमदारांनी मुंबईत येऊन दाखवावे असे आव्हान दिले आहे. त्यानंतर आता गुवाहाटी येथे मुक्कामी असलेले बंडखोर आमदार देखील संतापले आहेत. बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राऊतांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलंच सुनावलं आहे. मी आतापर्यंत शांत राहिलो. संजय राऊतांना आम्हीच मंत दिली. अगोदर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि नंतर ही वक्तव्ये करावी. ही वक्तव्ये कोण सहन करणार आहे? असे केसरकर म्हणाले आहेत. त्यांनी रविवारी टीव्ही ९ मराठीला मुलाखत दिली होती.

“आम्ही एकाच बापाचे आहोत, जे गेले ते अनेक बापाचे आहेत, असं संजय राऊत म्हणाले होते. महाराष्ट्राने महिलांना नेहमी सन्मान दिलेला आहे. कल्याणच्या सुभेदराचा पराभव केल्यानंतर छत्रपती शिवजी महाराजांनी त्यांच्या पत्नीला आईची उपमा दिली होती. त्यात शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणाऱ्या शिवसेनेमध्ये अशा तऱ्हेचा प्रवक्ता पक्षप्रमुखांना चालतो का. मी आतापर्यंत शांत राहिलो. या वक्तव्यातून काय अर्थ निघतो. त्यांना निवडून दिलं. आम्हीच मतं दिली तेव्हाच ते राज्यसभेत गेलेले आहेत. त्यांनी अगोदर राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि नंतर ही वक्तव्ये करावी. ही वक्तव्ये कोण सहन करणार आहे?” अशी परखड भूमिका केसरकर यांनी घेतली.

तसेच, “एखाद्याने तुमच्या कुटुंबाबद्दल बोलावं हा अधिकार राऊतांना कोणी दिला? आम्हाला शिवसेनेचं नाव असेल, त्यासोबतच आमची व्यक्तिगत मतंदेखील आहेत. कोकणात विजय मिळवायचा ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यासाठी माझं किती मोठं काम आहे हे सर्वांनाचा माहिती आहे. राऊतांकडून आम्ही असं ऐकायचं आहे का?” असा सवाल केसरकर यांनी केला.

“उद्धव ठाकरे हे नुसते पक्षप्रमुख नाहीयेत. तर ते राज्याचे घटनात्मक प्रमुखही आहेत. लोकांना रस्त्यावर उतरण्यास सांगितले जाते. नंतर दंगल होते. हे वक्तव्य दुसऱ्या एखाद्याने केलं असतं, तर तो आतापर्यंत तुरुंगात असता. काय चाललंय महाराष्ट्रात?” असा परखड सवाल केसरकर यांनी केला.

तसेच, उद्धव ठाकरे यांना चांगला राज्यकारभार करावा असा सल्ला केसरकर यांनी ठाकरेंना दिला. “तुम्ही संघटनात्मक प्रमुख आहात. जेव्हा तुम्ही फक्त पक्षप्रमुख असाल तेव्हा फक्त राऊतांकडे फक्त प्रवक्ते म्हणून बघाल. पण ज्यावेळी तुम्ही राज्याचे प्रमुख असता तेव्हा तुमच्यावर वेगळी जबाबदारी असते. जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली जाते, तेव्हा कोणावरही द्वेषभाव न दाखवता या राज्याचा कारभार करेन; अशी शपथ घेतली जाते. असाच कारभार कारा. अशी वक्तव्ये करुन पक्ष मोठा होत नसतो. उलट लोकांच्या नजरेतून पक्ष उतरत असतो,” असे केसरकर उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply